विभागीय कार्यशाळेत कार्यकर्त्यांचे आरोप; पक्षांतर्गत गटबाजीही चव्हाटय़ावर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकाची आपल्या संघटनेप्रती जी कमालीची निष्ठा असते ती वाखाणण्यासारखी असून कॉंग्रेसमध्ये मात्र या निष्ठेचा अभाव दिसून येतो. संघाच्या निष्ठेच्या भावनेमुळे जगातील ३१ देशांमध्ये संघाने आपल्या शाखा उघडल्या असून ऑनलाईन पध्दतीने स्वयंसेवकांची संख्या वाढवल्या जात आहे, या शब्दात अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांनी रा.स्व.संघाची स्तुती करून आम्ही कॉंग्रेसमध्ये पक्षनिष्ठा बळकट करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

यवतमाळ जिल्हा कांॅग्रेसच्या वतीने यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम पाच जिल्ह्य़ातील निवडक कार्यकर्त्यांंची विभागीय कार्यशाळा येथे झाली. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुकूल वासनिक बोलत होते. ते म्हणाले की, एका गावात संघाचा जर एकच स्वयंसेवक असेल तरी तो शंभर टक्के संघनिष्ठ असतो, पण कांॅग्रेसचे अनेक कार्यकत्रे असले तरी त्यांच्या मनाप्रमाणे घडले नाही, तर ते पक्षनिष्ठा बाजूला ठेवून कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असे दुर्देवी चित्र आहे. पक्षसंघटन मजबुतीसाठी पक्षनिष्ठा नितांत आवश्यक असल्याचा उपदेश त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीवर जोरदार प्रहार करून मुकूल वासनिकांना अवाक् केले. ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई बोंडे यांनी तर पक्षात चमचेगिरीलाच महत्व देऊन खऱ्या कार्यकर्त्यांला डावलले जाते, असा खळबळजनक आरोप केला. अशोक बोबडे यांनी पक्षात आता नेते तेवढे शिल्लक आहेत, पण कार्यकत्यार्ंची उणीव असल्याचे रोखठोक प्रतिपादन केले.

महिलांना पक्षात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप काही महिलांनी केला. बहुतेक कार्यकत्यार्ंनी स्थानिक नेतृत्वावर आणि ते करीत असलेल्या गटबाजीवर चांगलेच तोंडसुख घेतले. पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांना कार्यशाळेचे निमंत्रणच नव्हते, ही बाब थेट सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण या नेत्यांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याची चर्चा होती. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षात गटबाजी आहे, हेही स्पष्ट झाले. कार्यशाळेला शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, अनंतराव देशमुख, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार विरेंद्र जगताप, आमदार अमित झनक, वामनराव कासावार यांच्यासह पाच जिल्ह्य़ांतील महत्वाचे नेते हजर होते.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही अनभिज्ञ!

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कार्यशाळेची माहितीच नव्हती. अशी माहिती असती तर स्वत प्रदेशाध्यक्ष देखील कार्यशाळेला हजर राहिले असते, अशी माहिती आपल्या भाषणाच्या ओघात मुकूल वासनिक यांनी दिली. प्रदेशाध्यक्षही अनभिज्ञ असल्याचे वासनिकांच्या भाषणातूनच कार्यकर्त्यांना समजले आणि सारेचजण अवाक् होत पाहत राहिले. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निमंत्रण होते, पण त्यांनी गटबाजी लक्षात घेऊन त्यांनी येण्याचे टाळल्याची चर्चा होती.