|| रमेश पाटील

गारगाई प्रकल्पातील जमीन संपादनाची कार्यवाही सुरु; वाडय़ातील ग्रामस्थांना नोटिसा:- मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी वाडा तालुक्यात उभारण्यात येणा—या गारगाई प्रकल्पामुळे येथील जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत.जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्याबाबतच्या नोटीशी शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  विस्थापित होणारी सर्व कुटुंबे ही आदिवासी समाजाची आहेत.  जमीन संपादनाबाबत विविध वर्तमान पत्रातून मुंबई महानगर पालिकेने जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.

मुंबईच्या अतिरिक्त पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पामुळे एकुण ११०० हेक्टर जमीन धरणाखाली येणार आहे.  या जमीनीमधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने या धरणाचा मोठा फटका तानसा अभयारण्याला बसणार आहे.या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील विस्थापित होणाऱ्यांमध्ये ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर या महसुल गावांसह चार ते पाच अन्य पाडय़ांतील कुटुंबांचा समावेश आहे. तर मोखाडा तालुक्यातील आमले या गावातील सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत.

या धरणासाठी मोठय़ा प्रमाणत  वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम  धरण परिसरातील हजारो  वृक्ष संपदेवरसुद्धा होणार आहे.

विस्थापित होणाऱ्या सर्व कुटुंबियांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील हरोसाळे व देवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असलेल्या वनजमीनीवर होणार आहे.

गारगाई प्रकल्पामुळे एकुण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व कुटुंबांचे पुनवर्सन, आवश्यक परवानग्या याची कार्यवाही मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा करणारा प्रकल्प

मुंबईला दररोज ४४० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात हा गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर हा प्रकल्प होत आहे. ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या गारगाई धरणाच्या जलाशयातील पाणी बोगद्यद्वारे मोडकसागर धरणात आणून ते गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरविण्यात येणार आहे. यासाठी गारगाई ते मोडकसागर दरम्यानचे २.० किलोमीटर लांबीच्या बोगद्यचेही काम केले जाणार आहे.

गारगाई प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या आम्हा कुटुंबियांचे शेतजमीनीचा योग्य मोबदला तसेच सर्व सोयी, सुविधा देवून्  पुनर्वसन केले पाहिजे.

-गणपत बुधाजी कोरडे, पोलीस पाटील, ओगदा.

पालघर जिल्ह्यचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसानासाठी येथील बाधीत कुटुंबियांना ज्या सुविधा व मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे ते मिळणार असेल तर आमचा विस्थापित होण्याला विरोध नाही. –गणपत दोडे,  माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत