मुंबईतील नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक ब्रायन मिरांडा यांना खंडणीसाठी नाशिकरोड कारागृहातून धमकावल्या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अबु सालेम टोळीतील दोन कैद्यांना कारागृहातून ताब्यात घेतले. या निमित्ताने नाशिकरोड कारागृहातील सुरक्षितता आणि कैद्यांना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या सोईसुविधांवर प्रकाशझोत पडला आहे.
अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला सचिन खांबे व सचिन शेट्टी अशी या दोन्ही कैद्यांची नांवे आहेत. हे दोघेही अबु सालेम टोळीचे सदस्य आहेत. कारागृहात असताना संबंधितांनी भ्रमणध्वनीवरून मिरांडा यांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मिरांडा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. ही तक्रार दिल्यानंतरही त्यांना धमकीचे भ्रमणध्वनी येत राहिले. दरम्यानच्या काळात या प्रकरणी मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला. शुक्रवारी या पथकाने खांबे व शेट्टीला येथील कारागृहातून ताब्यात घेतले. कारागृहातून संबंधितांनी धमकीचे दूरध्वनी कसे केले, याची छाननी पोलिसांनी सुरू केली आहे. नाशिकरोड कारागृह वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहे. काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशैली उघड केली होती. त्या प्रकरणात तत्कालीन कारागृह निरीक्षक व काही अधिकारी निलंबित झाले होते. मुंबईतील नगरसेवकाला कारागृहातून कैद्यांनी धमकावल्याच्या प्रकाराने नाशिकरोड कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.