यंदा गणेशोत्सवनिमित्त रस्तेमार्गे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास खडतर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान महामार्ग पोलिसांसमोर असतानाच या महामार्गासंदर्भात आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं. मात्र त्याहूनही महत्वाची घोषणा त्यांनी सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली.

“बाकी गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा गणपतीनिमित्त कोकणवासियांचा प्रवास सुसह्य होईल हा विचार करण्याची गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. तुम्ही त्या मार्गाने कधी प्रवास करणार आहात, कधी जाणार आहात ते ही सांगा. आपल्या उत्तरात पनवेल ते इंदापूर आहे. आम्ही नवी कंत्राटदार नेमतोय, संस्था नेमकतोय असं म्हणाल्या. आज १८ तारीख आहे, ३१ ला गणपती येत आहेत. तुम्ही संस्था कधी नेमणार? या गोष्टींना उशीर झाला आहे,” असं भास्कर जाधव यांनी प्रश्न विचारताना सध्याची परिस्थिती आणि उपाययोजनांबद्दल सभागृहात माहिती दिली.

नक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…

“परशुराम घाट नेहमीच अडचणीचा विषय राहणार आहे. हा कधीही संपणारा विषय आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील खामगाव, धामण-दिवी ते चिपळूण असा एक नवा रस्ता निघण्याची शक्यता आहे त्याचा आपण सर्वेक्षण करणार का? हे माझे प्रश्न आहेत,” असं जाधव यांनी आपले प्रश्न मांडताना म्हटलं.

या प्रश्नाला राज्याचे नवे सर्वाजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं. “संपूर्ण कोकणातील लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना यासंदर्भात करतील सर्व सूचनांचा आदर करुन शक्य त्या सर्व गोष्टी करण्याचा मी प्रमाणिकपणे प्रयत्न करेन,” असं चव्हाण उत्तरात म्हणाले. तसेच, ” २५ ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यासंदर्भात आपण आधीच आदेश दिले आहेत. २६ तारखेला तुमच्यापैकी कोणी आलं तर आपण त्या मार्गाने एकत्र जाऊयात,” असंही चव्हाण म्हणाले.

नक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

यानंतर आमदार राजन साळवी यांनी याच विषयावरुन काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना विचारले. “मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण व्हावा असं कोकणवासियांचं स्वप्न होतं. मात्र केंद्र असेल किंवा राज्य असेल यांच्या माध्यमातून मागील १२ वर्षांमध्ये गोव्याच्या हद्दीपासून लांझा तालुक्यातील वाखेडपर्यंतचं काम जवळजवळ १०० टक्के पूर्ण झालेलं आहे. पण वाखेड ते पनवेलपर्यंत रस्ता पूर्णत: तशाच परिस्थितीमध्ये आहे. मी कालच एका सभेसाठी महाडला गेलो होतो. महाड ते पनवेलपर्यंतचं अंतर कापण्यासाठी दोन तास लागतात. तिथे पाच तास लागले ही वस्तूस्थिती आहे,” असं म्हणत साळवी यांनी नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”

“जागेचा मोबदला मिळणार का? लवादा आणि न्यायालयाचे निर्णय लवकर होणार का? पूलाची कामं पूर्ण होणार का? या मार्गावरील पाईपलाइन, विजेच्या तारा टाकण्याचं कामं पूर्ण होणार का? या सर्व प्रश्नासाठी संयुक्तपणे दौरा करुन प्रश्न निकाली निघणार का?” असे प्रश्न साळवी यांनी विचारले. राजन साळवी यांनी विचारलेल्या या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी, “साळवींनी एकत्रितपणे प्रश्न मांडले असून या सर्व समस्या सोडवण्यासंदर्भात योग्य ते निर्णय लवकरच घेऊ,” असं म्हटलं.

सध्याची परिस्थिती काय?
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे, पालघरमधून मोठ्या संख्येने नागरिक रस्तेमार्गे कोकणात जातात. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कोकणात जाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. रेल्वे गाड्याचे तिकीट उपलब्ध होत नसून एसटी गाडय़ांचेही मोठया प्रमाणात आरक्षण होत आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बसने आणि वैयक्तिक वाहन घेऊन कोकणात जाणाऱ्यांचीही संख्या यावेळी अधिक असणार आहे. गणेशोत्सवात कोकणपर्यंतचा रस्तेमार्गे खडतर प्रवास सुकर करण्यासाठी महामार्ग पोलिसांनीही कंबर कसली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर २४ ठिकाणी खड्डे आहेत. यापैकी वाकण पट्ट्यात सर्वाधिक म्हणजे आठ ठिकाणी आणि महाड पट्ट्यात सात ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, तर पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्ट्यातही मोठया प्रमाणात खड्डे आहेत. या पट्ट्यातून जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न महामार्ग पोलिसांना करावा लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पुणे-कोल्हापूर महामार्ग,  खोपोली-वाकण राज्यमार्ग या मार्गाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई-गोवासह अन्य महामार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही खड्डे आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी २७ ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची कामे पूर्ण करावी, असे निर्देश महामार्ग पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

परशुराम घाटात २४ तास यंत्रणा :
गणेशोत्सवकाळात वाढणारी वाहतूक लक्षात घेता परशुराम घाट परिसरातच आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ २४ तास कार्यरत राहणार आहे. पाऊस अद्याप सुरू असून वाहतूक कोंडी, दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने येथील परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

खड्डे कुठे?

  • पळस्पे- रामवाडी ते वाशी नाका, वाशी नाका ते वडखळ बायपास पुलाच्या सुरुवातीपर्यंत, वडखळ गावाजवळून जाणारा मार्ग
  • वाकण- निगडे पूल ते आमटेम गाव, एच. पी. पेट्रोल पंप कोलेटी ते कोलेटी गाव, कामत हॉटेल नागोठणे ते गुलमोहर हॉटेल चिकणी, वाकण फाटापासून सुमारे १०० मीटरपुढे, सुकेळी खिंड, पुई गाव येथील म्हैसदरा पूल, कोलाड रेल्वे ब्रिज ते तिसे गाव, रातवड गाव.
  • महाड- सहील नगर, दासगाव, टोलफाट्याच्या अलीकडे, वीर रेल्वे स्थानकासमोर, मुगवली फाटा, एच. पी. पेट्रोलपंप ते नागलवाडी फाटा, राजेवाडी फाटा
  • कशेडी- पोलादपूर सडवली नदी पूल ते खवटी अनुसया हॉटेलपर्यंत, भरणे नाका खेड येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस.
  • चिपळूण- परशुराम घाट, बहादूर शेख नाका ते चिपळूण पॉवर हाऊस, आरवली एसटी स्थानक, संगमेश्वर ते बावनदी