मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची एक्स्प्रेस सेवा कोलमडली आहे. अस्वली स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात रुळावर पाणी जमा झाल्याने मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस सेवेचा खोळंबा झाला. यामुळे मेल एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडलं. कसारा, आसनगाव, या स्थानकात गोरखपूर, दुरांतो एक्स्प्रेस या महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या एक्स्प्रेस थांबून राहिल्या. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पाच ते सहा एक्स्प्रेसही खोळंबल्या. राज्यराणी एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकात थांबवण्यात आल्या. एक्स्प्रेस सेवा रखडल्याचा परिणाम मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेवरही झाला.

पाडली ते घोटी या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साठलं.ज्यामुळे कुर्ला मनमाड गोदावरी एक्स्प्रेसही घोटी स्थानकात उभी आहे. दरम्यान नाशिकमध्ये पावसाचा जोर पाहण्यास मिळाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं. तर गंगापूर धरणातून गोदापात्राता 1 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नासर्डी नदीला पूर आला. तिडके कॉलनी पुलावरूनही पाणी जात होते. गोदावरी नदीत असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत बुडाली. दरम्यान मुंबईहून डाऊन दिशेची वाहतूक पूर्ववत झाल्याचे ट्विट सेंट्रल रेल्वेने काही वेळापूर्वीच केले आहे.