दरड कोसळल्यामुळे आदल्या दिवशी विस्कळीत झालेली नाशिक-मुंबई दरम्यानची रस्ते वाहतूक सुरळीत होत असतानाच गुरुवारी सकाळी घाटातील नव्या मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला मोठा तडा गेल्यामुळे महामार्ग पोलीस व स्थानिक यंत्रणेची एकच धावपळ उडाली. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या या मार्गावर एकेरी वाहतुकीची खबरदारी घेतली गेली. दरम्यान, नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत असून सर्व रेल्वेगाडय़ा दोन ते बारा तासाच्या विलंबाने धावत आहेत.
कसारा-इगतपुरी दरम्यान लोह मार्गावर दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी सुरळीत होऊ शकली नाही. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा दोन ते बारा तासांच्या विलंबाने धावत आहेत. कसारा घाटातील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम पूर्णत्वास गेल्याने सकाळी सुरळीत झालेली मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अवघ्या काही तासात पुन्हा अडचणीत सापडली. कसारा घाटात रस्ते वाहतुकीसाठी दोन मार्ग असून त्यातील नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणी मोठा तडा गेला. ही बाब लक्षात आल्यावर महामार्ग पोलीस, टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मार्ग दुपदरी असल्याने तडा गेलेल्या बाजुकडील वाहतूक बंद करण्यात आली. या भागाच्या सभोवताली अडथळे निर्माण करून पोलीस यंत्रणेने या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू केली. रस्त्याला गेलेला तडा परस्परांपासून विलग झाल्यास घाटात गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते अशी स्थिती आहे.
नाशिकची पाणीकपात टळणार
सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरूवारी बहुतांश भागात काहीशी विश्रांती घेतली.गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात ६६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असून, गंगापूर धरणातील जलसाठा अवघ्या काही दिवसात ८० टक्क्यांवर पोहोचला. दारणा धरणाचा विसर्गही निम्म्याने कमी होऊन ११ हजार क्युसेक्सवर आला आहे. दारणा व गोदावरी नदीचा पूरही ओसरला. पावसामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या काही अंशी मार्गी लागली आहे. धरणांच्या जलसाठे उंचाविण्यास पावसाने महत्वाची भूमिका निभावली. नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण जवळपास ८० टक्के भरले आहे. यामुळे शहरावरील पाणी कपातीचे संकट दूर होणार आहे. काश्यपी धरणात २५ टक्के, गौतमी गोदावरी ३०, पालखेड ९०, करंजवण ३८, वाघाड ५२, ओझरखेड १८, पुणेगाव ५६, दारणा ७८, भावली ९१, मुकणे २३, वालदेवी ५३, नांदूरमध्यमेश्वर ५४, कडवा ६४, आळंदी ४३, भोजापूर १०, चणकापूर ४६, पुनद ४७, हरणबारी ६८, केळझर ३६, गिरणा १० टक्के असा जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai nashik nh slides at kasara ghat
First published on: 01-08-2014 at 03:01 IST