जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली. या हत्येची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. राज्यात सहा जलदगती न्यायालये स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली, मात्र गेल्या काही वर्षांपासून ते तेवढी एकच घोषणा करीत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली. पीडित आगे कुटुंबाला त्यांनी पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
मुंडे यांनी बुधवारी खर्डा येथे जाऊन पीडित आगे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबाशी त्यांनी स्वतंत्रपणे अर्धा तास चर्चा केली. नितीनची हत्या हा नियोजनबद्ध कट होता असे मत व्यक्त करून मुंडे यांनी या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेचीच मागणी केली.
नंतर मुंडे म्हणाले, राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस आघाडीचे राज्य आहे, मात्र आता या राज्यात दलित सुरक्षित राहिले नाहीत अशीच स्थिती आहे. या राज्य सरकारमध्ये पाटील हेच दहा-अकरा वर्षांपासून गृहमंत्री आहेत. मात्र दलितविरोधी अत्याचारांच्या खटल्यांसाठी पुन:पुन्हा ते जलदगती न्यायालयांची केवळ घोषणाच करतात. त्याची अंमलबजावणी का होत नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. राज्यात दलितांवरील अत्याचारांचे १ हजार ६०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही. शिवाय, या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाणही तुलनेने नगण्य आहे. खर्डा येथील ही घटना आणि दलित अत्याचारांच्या बाबतीतील राज्य सरकारचे दुर्लक्ष या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2014 रोजी प्रकाशित
एकच घोषणा किती दिवस करणार?- मुंडे
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या झाली. या हत्येची जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.

First published on: 08-05-2014 at 04:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde criticized r r patil over atrocity case