लोकसभा निवडणुकीतील खर्चासंदर्भातील वक्तव्यावर निवडणूक आयोगाची नोटीस आपणास मिळाली असून, त्याला आपण उत्तर देणार असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत ९ कोटी रुपये खर्च केल्याचे विधान केल्यानंतर मुंडे यांना नुकतीच निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावली आहे. याबाबत बोलताना त्यांनी वरील उत्तर दिले.
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी घेतलेल्या काडीमोडसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता नीतिशकुमारांनी सोडून जायची घाई केली असे नमूद करून मात्र, अन्य काही घटक पक्ष भाजपबरोबर येतील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान आपले पुतणे धनंजय मुंडे यांना आपल्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरवत असल्याबाबत छेडले असता मुंडे यांनी नाराजीच्या स्वरामध्ये माझी उमेदवारी नक्की आहे. समोर कोण ते ज्या त्या वेळी पाहू, असे सांगितले.