अपघातग्रस्त गाडी पाहिल्यास गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू होऊ शकतो हे पटत नाही. मुंडेंच्या घरातील कोणी पोहोचण्यापूर्वीच शवविच्छेदन कसे केले, या प्रश्नांमुळे त्यांच्या मृत्यूबाबत सर्वसामान्यांच्या मनातही संशय निर्माण झाला आहे. परंतु भाजपची मंडळी काहीच बोलत नाहीत. खासगीत विषय काढू देत नाहीत. पक्षात मुंडेंना काय वागणूक मिळत होती हे सर्वाना माहीत आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या मृत्यूबाबत भाजपअंतर्गत वादाकडे अप्रत्यक्ष अंगुलीनिर्देश केला. बहुजन समाजाचे नेतृत्व निवडणुकीत मते घेण्यापुरतेच भाजपला लागते, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा येथे निर्धार मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बीडचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व आपले राजकीय मतभेद होते, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, राजकीय नेतृत्व एका दिवसात तयार होत नाही. लोकांच्या सुख-दु:खात सातत्याने धावून जावे लागते. अनेकदा अभिनंदनाचे हार मिळतात, तर अनेकदा काळे झेंडेही सहन करावे लागतात. ४० वषार्ंच्या कष्टातून मुंडेंचे नेतृत्व उभे राहिले होते. मात्र, केंद्रीय मंत्री झाल्यानंतर सत्कारासाठी परळीला निघाले असताना त्यांच्या गाडीला दिल्लीत अपघात झाला. परंतु अपघातग्रस्त गाडी पाहिली तर अशा मोठय़ा माणसाचा अशाप्रकारे मृत्यू होऊ शकतो, हे पटत नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणी पोहोचण्यापूर्वीच शवविच्छेदन केले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वसामान्यांत संशय आहे. परंतु भाजपवाले त्याविषयी काहीच बोलत नाहीत. खासगीत मुंडेंच्या मृत्यूबाबत विचारणा केल्यास विषय काढू देत नाहीत. भाजपवाल्यांच्या पोटात एक व ओठात एक असल्याचा आरोप करून मुंडेंच्या मृत्यूबाबतचे स्पष्ट कारण लोकांना कळलेच पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचे परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप सरकारने निधी देण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.