पालिका निवडणूक रत्नागिरी-सिंधूदूर्ग
कोकणातील नगरपालिकांच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. रत्नागिरीचे राजकारण हे नेहमीप्रमाणेच व्यक्तिकेंद्रित झाले आहे. सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध सारे हे चित्र कायम आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या चार नगर परिषदांपैकी रत्नागिरी व चिपळूण या दोन ठिकाणी सर्वाचे लक्ष लागलेले आहे. रत्नागिरी शहरात भाजप व सेनेची युती झाली नसली तरी त्यांचे दुबळे विरोधक असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपल्या मर्यादा ओळखत आघाडी केली आहे. भाजप व सेनेचे स्थानिक नेते आपापल्या पक्षांचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यात सेनेच्या बाजूने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपेक्षाही आमदार उदय सामंत आणि त्यांच्या विश्वासातील चमूने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येत आहे. किंबहुना, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहुल पंडित यांना विजयी करण्याची धुरा सामंत एकहाती सांभाळत आहेत. त्याचबरोबर या निवडणुकीत सेनेचे दुसरे आमदार राजन साळवी कशा प्रकारे जबाबदारी निभावतात, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. कॉंग्रेस आघाडीची सर्व निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश शेटय़े यांच्या भवतीच फिरत असून त्यांनी केलेल्या तिकीटवाटपावर नाराज होऊन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटय़े यांच्यासह शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अर्थात नगराध्यक्षपदी निवडून येणे हे शेटय़ेंचे एकमेव ध्येय असल्यामुळे या पडझडीकडे त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे बहुमतासाठी मुख्य लढत भाजप व सेना या मित्रपक्षांमध्येच आहे.
जाहीरनाम्यांचा उपचार
सर्व प्रमुख पक्षांनी रिवाज म्हणून जाहीरनामे प्रसिद्ध केले असले तरी विकासाच्या अन्य कोणत्याही मुद्दय़ापेक्षा शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या नळपाणी योजनेवरून गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेली श्रेयवादाची लढाई निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून पुढे खेळली जात आहे. बाकी सर्वाचे जाहीरनामे, मुद्दय़ांचा क्रम वगळता सारखेच वाटावे असे आहेत.
चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना निवडणुकीचे सर्वाधिकार देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी शेखर निकम व जिल्हा प्रभारी व माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव सुरुवातीपासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्हास्तरीय नेत्यांनी अलिप्ततेची भूमिका स्वीकारली आहे. तसेच जाधवांच्या काही शिलेदारांनी शिवसेनेची वाट धरली असून स्वत: जाधव तूर्त तरी राष्ट्रवादीतच राहून कदम यांच्या विरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत. स्वाभाविकपणे येथेही व्यक्तिगत राजकारण वरचढ ठरले आहे. राजापुरात मागील निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीने निसटते बहुमत मिळवले होते. यंदाही तीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र एका जागेसाठी होत असलेली मैत्रीपूर्ण लढत काही फरक करू शकते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
खेडमध्ये कदमांची भाऊबंदकी
कोकणात मनसेचे अस्तित्व राखणाऱ्या खेडमध्ये या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध इतर सर्व, अशा लढती रंगल्या असून सेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाचा त्यामध्ये कस लागणार आहे. त्यातच त्यांचे सख्खे बंधू सदानंद कदम मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडीला जाऊन मिळाले असल्यामुळे या निवडणुकीला भाऊबंदकीचे उपकथानक जोडले गेले आहे.
दापोली नगर पंचायतीचीही निवडणूक होत असून तेथेही भाजप व सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून काँग्रेस व राष्ट्रवादीने संयुक्त आघाडी केली आहे. यंदा येथे ९ जागा महिलांसाठी राखीव झाल्यामुळे सक्षम महिला उमेदवार मिळवताना सर्वच पक्षांची दमछाक झाली. त्यपैकी भाजपने १७ पैकी तब्बल ५ मुस्लीम उमेदवार देत आपल्या परंपरागत प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत आघाडीची मदार मुख्यत्वे राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार संजय कदम यांच्यावर आहे, तर सेनेकडून ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश व माजी आमदार सूर्यकांत दळवी विधानसभा निवडणुकीत गेलेली पत पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
सिंधुदुर्गात समीकरणे बदलली
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ले या तीन नगर परिषदा व देवगड नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक येत्या रविवारी होत आहे. त्यापैकी सावंतवाडी नगर परिषदेतील सर्व जागा गेल्या निवडणुकीत तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जिंकण्याचा विक्रम केला होता. आता हीच किमया सत्ताधारी युतीमधील शिवसेनेचे राज्यमंत्री झालेल्या केसरकरांना पुन्हा करून दाखवायची आहे. पण गेल्या पाच वर्षांतील घडामोडींमुळे चित्र बरेच बदलले आहे.
मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप-सेना युती झाली असली आणि सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून राणेंसारख्या मुरब्बी राजकारण्यामुळे तर हे आव्हान खूपच अवघड आहे.
सर्व प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी हेच मुख्य वैशिष्टय़ असलेल्या वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत राणे काँग्रेस आणि केसरकर सेना यांच्यातच मुख्य मुकाबला होत असून गेली पाच वष्रे सत्तेत राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस केसरकरांच्या जाण्यामुळे अतिशय दुबळी झाली आहे. तसेच भाजप-सेनेचीही युती होऊ शकलेली नाही.