काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने नाना पटोले शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, भाजपाचे आरोप प्रत्यारोप, राज्यातलं विजेचं संकट अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. याचवेळी बोलता बोलता त्यांनी नरेंद्र मोदी हे भाजपाचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत, असं वक्तव्यही केलं आहे.
पुढच्या काळात पूर्ण देशच अंधारात जाईल अशी परिस्थिती
राज्यातल्या वीजप्रश्नावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले,” विजेचं संकट हे केंद्राच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही विजेचं संकट निर्माण झालेलं आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग वाढत आहे. कोळश्याचा अभाव आणि केंद्र सरकारची राजनीती त्यामध्ये आडवी येत आहे. त्यामुळे पूर्ण देशच पुढच्या काळात अंधारात जाईल काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे”.
शरद पवारांच्या घरावरचा हल्ला
शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले,” शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने निषेध केला. काही लोकांनी, विरोधकांनी सांगितलं की हे गृहविभागाचं, गुप्तचर विभागाचं अपयश आहे. आम्ही एसटी कामगारांना आमचं मानतोय, हे आमचे लोक आहे. जेव्हा तीन काळ्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं, तेव्हा देशाचे पंतप्रधान, भाजपाचे पंतप्रधान…त्यांना भाजपाचेच पंतप्रधान म्हणावं कारण ते भाजपाचेच आहेत, देशाचे पंतप्रधान नाहीत. त्यांनी काय केलं की लोकसभेत त्यांनी आंदोलनजीवी, आतंकवादी म्हणाले. शेतकऱ्यांविषयी, देशाच्या अन्नदात्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची हिंमत कशी झाली, हाही प्रश्न तिथे निर्माण झाला. एसटी कामगार आमचे बंधू भगिनी आहे. त्यांना न्याय मिळावा अशी भूमिका आम्ही कायमच मांडली. जे काही न्यायालय निर्णय देईल, त्याप्रमाणे शासन निर्णय घेईल या पद्धतीची भूमिका पण त्यांच्यासमोर मांडली. पण भाजपाने फूस लावून…स्वतःची सत्ता असताना त्यांच्याच वित्तमंत्र्यांनी काय म्हटलं होतं हे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलं होतं. राज्यातल्या जनतेला दळणवळणापासून दूर ठेवणं, राज्यात अस्थिरता निर्माण करणं हा भाजपाने पहाटेची सत्ता गेल्यानंतर जो गोरखधंदा सुरू केला आहे, त्याचे परिणाम राज्याच्या जनतेला भोगावे लागत आहेत. आणि एसटी कर्मचाऱ्यांना फूस लावून ज्याप्रमाणे शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला, या हल्ल्याची चौकशी सुरू आहे. बोलवता धनी कोण हे पुढच्या काळात निश्चित समोर येईल”.
सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी भाजपाच
त्यांना अनिल देशमुखांसंदर्भातला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाना पटोले म्हणाले, “आम्ही सुरूवातीपासूनच सांगितलं की सत्य पराजित हो नही सकता. त्रास होऊ शकतो. केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रातलं भाजपाचं सरकार सत्तेचा दुरुपयोग करून त्यांचा वापर करत आहे. त्यातलं आज ना उद्या खरं जनतेसमोर येणारच आहे. भ्रष्टाचारी तर सगळ्यात जास्त भाजपाच आहे. आता भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा केले, त्याचा हिशोब देणार नाहीत, आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसे गोळा केले, किरीट सोमय्यांचं त्यावेळचे ट्वीट आहे, आता ते म्हणतात की आम्ही पैसे गोळा केलेच नाही. आज जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला भाजपा ज्या पद्धतीने विरोधकांना आणि केंद्रातल्या भाजपाच्या धोरणाच्या विरोधात…आम्ही कोणा व्यक्तीविषयी बोलत नाही, पण त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश जो डबघाईला आलाय, त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांवर ईडीची कारवाई करू, सीबीआय मागे लावू अशा प्रकारचं कृत्य चाललेलं आहे. हे हुकुमशाहीकडे नेत आहे, हिटलरशाही कडे नेत आहे. देशात अघोषित आणिबाणी जाहीर करण्याचं पाप केंद्रातलं सरकार करत आहे”.