काही आठवड्यांपूर्वी आपल्या मतदारसंघामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींचा उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गोंधळ झाल्यानंतर आता नाना पटोले पुन्हा एकदा वादात अडकलेत. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना नाना पटोलेंनी काँग्रेसकडून महात्मा गांधीसंदर्भात कायम आक्षेप घेतला जाणारा शब्द आपल्या भाषणात वापरलाय.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोलेंनी, “महात्मा गांधींनी अहिसेंच्या माध्यमातून भारताला तर स्वातंत्र्य दिलंच पण त्याचबरोबर जगालाही संदेश देण्याचं काम या माध्यमातून केलं. महात्मा गांधीच्या हत्या करणाऱ्याच्या रुपाने आजच्या दिवशीच देशाला पहिला दहशतवादी, नथुराम गोडसे हा पुढे आला. आजच्याच दिवशी महात्मा गांधींचा वध नथुराम गोडसेंनी केला,” असं म्हटलं. यामध्ये त्यांनी ‘महात्मा गांधींचा वध’ हा शब्द प्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काॅग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध या शब्द प्रयोगाला विरोध केलाय. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षांनीच हा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुढे बोलताना नाना पटोलेंनी, “आपले नेते राहुल गांधींनी यांनी यासंदर्भात योग्य ट्विट केलंय. ते म्हणतात की हिंदुवाद्यांना वाटतं की महात्मा गांधी संपलेत. पण महात्मा गांधी हे व्यक्ती नव्हते ते विचार होते. महात्मा गांधींचा विचार स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि भविष्यातही राहणार आहे. हा न संपणारा विषय आहे. हाच विचार देशाला महासत्ता बनवण्यास यशस्वी होईल. असा ठाम विश्वास देशातील कोट्यावधी जनतेमध्ये आहे. हिंदुवाद्यांना वाटत असेल की महात्मा गांधी संपलेत. महात्मा गांधी संपले नाहीयत तर अजून ताकदीनं त्यांचा विचार सर्वत्र पसरवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. म्हणून महाराष्ट्रात आज सगळीकडे महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करण्याचं काम करत आहोत,” असं कार्यकर्त्यांना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.