राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवारपासून सुरूवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकरी आत्महत्येवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात १७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा – अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य; म्हणाले, “तुमच्याकडे कृषीमंत्रीपद आल्यामुळे मी…”!

“पुरस्थितीमुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज होती. मात्र, ते दिले गेले नाही. त्यामुळे राज्यात १७५ च्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पुरस्थितीबाबतचे निर्णय योग्य वेळी झाले असते, तर राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या”, असे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – रायगडमधील संशयित बोटीसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती; म्हणाले, “ही बोट…”

“ज्यावेळी १३ ते १५ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली, त्यावेळी कापूस, धान यासारख्या पिकांची लागवड झालेली होती. अशा वेळी शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. मात्र, प्रशासन तिथे पंचनामे करण्यासाठी गेले नाही. त्यामुळे आपलं कोणीही वाली नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली. कारण राज्यात पूर्ण सरकार अस्थित्वात नव्हते. बराच वेळ मंत्रीमंडळाच्या विस्तारात गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्या”, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.