नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीपूर्वी केलेल्या बंडखोरीसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोपही केले. “बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं होतं,” असं ते म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
हेही वाचा – ‘काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “मी…”
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीतील उमेदवारीसह विविध विषयावर भूमिका स्पष्ट केली. मात्र, यावेळी त्यांनी सत्यजीत तांबेंच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तांबेंच्या आरोपांबाबत आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील, असं ते म्हणाले.
हेही वाचा – “पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले,” सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट! पत्रकार परिषदेतच दिले पुरावे
“कसबापेठसाठी उद्या उमेदवार जाहीर होणार”
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी कसबापेठ पोटनिवडणुकीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. या पोटनिवडणुकीसाठी अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नसून आम्ही सात इच्छूक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. उद्या रात्रीपर्यंत ही नावं जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
“गरज संपली की फेकून द्या, हीच भाजपाची भूमिका”
पुढे बोलताना त्यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं. भाजपाने आज पिंपरी चिंचवड आणि कबसापेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, भाजपाने कसबापेठच्या जागेसाठी टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न दिल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या. यावरून नाना पटोले यांनीही भाजपाला लक्ष्य केलं. भाजपाची नियत योग्य नाही. गरज संपली की त्यांना फेकून द्या, अशी पद्धतीची भाजपाची भूमिका आहे. मुक्ता टिळक यांची तब्बेत खराब असतानाही त्या भाजपाला आवश्यकता असेल तेव्हा विधानसभेत मतदान करण्यासाठी येत होत्या. मात्र, आज भाजपाने ज्यापद्धतीने त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी नाकारली हे योग्य नाही, असे ते म्हणाले.