आपण गावगुंड मोदीबद्दल बोललो होतो असा दावा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ज्या गावगुंडाचा उल्लेख नाना पटोलेंनी केला होता तो आता समोर आला आहे. नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या विरोधात काही गुन्हे दाखल असून आपण घाबरलो होतो त्यामुळे गायब होतो असा दावा उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने केला आहे. सध्या भंडारा पोलीस उमेश घरडेची चौकशी करत आहेत. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे.

उमेश घरडे हा पत्नी आणि मुलांसोबत न राहता एकटाच राहत आहे. मात्र घरडेविरोधात पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नाही असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. भाजपाने नाना पटोले यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत पोलिसांतही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत आपण स्थानिक गावगुंडाच्या संदर्भात बोलत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उमेश घरडे हा मोदी नावाचा गावगुंड समोर आला आहे.

वकीलांमार्फत गावगुंड मोदी पत्रकारांसमोर आला. भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी असलेल्या उमेश घरडेने, “मी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोललो आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला होता असे म्हटले. अनेक लोकं माझ्या मागे लागले त्यामुळे मी घाबरून समोर येत नव्हतो,” असे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोले म्हणाले असल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले होते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं होतं.