मागील काही दिवसांपासून काँग्रेसने अदाणी प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीला धारेवर धरलं आहे. हिंडेनबर्ग संस्थेनं जारी केलेल्या अहवालावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदाणी प्रकरणावर मतप्रदर्शन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हिंडेनबर्ग कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? हेही माहीत नव्हतं. अशा विषयांवर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं,” असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या विधानानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

शरद पवारांच्या या विधानावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी जी भूमिका मांडली, तीच त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना ती लखलाभ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा- शरद पवारांनी अदाणींबाबत विधान केल्यानंतर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका; म्हणाले, “त्यांची भूमिका…”

गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “देशातील जनतेचे एलआयसी व एसबीआयमध्ये असलेले पैसे आणि कर्मचाऱ्यांचा पीएफ (प्रोव्हिडंट फंड किंवा उदरनिर्वाह निधी) खोट्या कंपन्या दाखवून अदाणी समूहाने लुटला आहे. त्याबद्दलचं सगळं चित्र जनतेसमोर आलं आहे. हे सगळं सुरू असताना जेपीसीकडून (संयुक्त संसदीय समिती) तपास करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय अडचण आहे? मोदी व अदाणी यांचे संबंध काय आहेत? हे प्रश्न सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले पक्षांनी लोकसभेत विचारले आहेत. त्यामुळे ‘चोर के दाढी में तिनका’ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.”

हेही वाचा- “डिग्री काय, मोदी हा माणूसच बनावट! १९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?”

“काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. या देशातील लोकांची आर्थिक लूट होत असताना काँग्रेस शांत बसणार नाही. काँग्रेस जेपीसीची मागणी करेल, यावर काँग्रेस अटळ आहे. शरद पवारांनी जी काही भूमिका मांडली, ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना ती लखलाभ. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनपर्यंत अदाणी प्रकरणावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’, असं दिसतंय किंवा पूर्ण डाळच काळी असेल. अदाणी आणि मोदींच्या संबंधांबाबत राहुल गांधींनी संसदेत जी भूमिका मांडली, त्यानुसार काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole reaction on sharad pawar statement about gautam adani case hindenburg research rno news rmm
First published on: 08-04-2023 at 18:01 IST