Nana Patole : महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हे सगळे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत असं नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं होतं. आता आज नाना पटोले यांनी यासंदर्भातला पेन ड्राइव्हच दाखवला. शिवाय ठाणे, नाशिक, मुंबई ही हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत असाही आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो असंही नाना पटोले विधानसभेत म्हणाले.

नाना पटोले यांनी काय म्हटलं आहे?

हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नाही. मात्र या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत अशी विनंती नाना पटोलेंनी केली.

नाना पटोले यांनी काय म्हटलं होतं?

राज्यातील ७२ हून अधिक अधिकारी, काही मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांकडून गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आले असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आज मी हा विषय विधानसभेत मांडला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली.

नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण गंभीर-जयंत पाटील

नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनीही या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन द्यायला पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्ही या मुद्द्याची दखल घेतल्याचं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ जुलैला जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?

हनी ट्रॅपमुळे नाशिकचे नाव खराब होत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या तक्रारीबद्दल मला माहिती नाही. पण, अशा प्रकरणांमध्ये नाशिकसारख्या पुण्यभूमीचं नाव यावं हे दुर्दैव आहे. हे सर्व ज्या व्यक्तीच्या नावाभोवती फिरतंय, त्या व्यक्तीचं राजकीय संबंध, त्या व्यक्तीची राजकीय वर्तुळातील वागणूक पाहता महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, हे कळत नाही. केवळ पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या पातळीवर घसरतोय? कोणत्या अनैतिकतेचा वापर करतोय? हे सर्व धक्कादायक आणि दुःखद आहे.” आता नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला आहे. ज्यानंतर सरकार काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.