महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये शनिवारी (६ मे) शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने महाविकास आघाडीतला ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र उद्धव ठाकरेंवर नाराज आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबत म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की हे करू नका. पण तरी त्यांनी केलं. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार आहोत.

खरंतर स्नेहल जगताप या गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेत (ठाकरे गट) जाण्यास इच्छूक होत्या. सहा महिन्यांपूर्वी जगताप यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना विनंती केली की, जगताप यांना पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळे बरेच महिने हा प्रवेश रखडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा पक्षप्रवेश पूर्ण झाला.

हे ही वाचा >> “काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाल्यामुळे…”, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर भरत गोगावले महाड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मुळात काँग्रेसचे माणिकराव जगताप (स्नेहल जगताप यांचे वडील) या मतदार संघातून निवडणूक लढत होते. आता स्नेहल जगताप या इथल्या उमेदवार असतील. उद्धव ठाकरे सध्या ४० बंडखोर आमदारांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या आमदारांना पर्याय शोधत आहेत.