कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना ही माहिती दिली. नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. नाणार प्रकल्प रद्द झाला असला तरी जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प होऊ शकतो असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. अलीकडेच कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. त्यावरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जठाराग्नी’ शांत करण्याचा सल्ला दिला होता. नाणार प्रकल्प झालाच पाहिजे हे ठणकावून सांगणे हा नीचपणा जितका तितकाच निर्घृणपणा आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. नाणार रिफायनरी रद्द करण्याच्या निर्णयाचे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी स्वागत केले आहे. सौदी अरेबियातील सौदी आराम्को कंपनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार होती. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची ५० टक्के भागीदारी असणार होती.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanar refinery projecet cancel by maharashtra govt
First published on: 02-03-2019 at 18:07 IST