कोल्हापूर : येथील नांदणी मठातील हत्ती ताब्यात घेण्यावरून सुरू असलेला संघर्ष आता रस्त्यावरून संबंधित प्राणी संग्रहालयाचे मालक असलेल्या उद्योजकाच्या भ्रमणध्वनी सेवेकडे आज सरकला आहे. स्थानिक गावातील ग्रामस्थ, भाविक आणि जैन समाजाकडून संबंधित उद्योजकाच्या भ्रमणध्वनी सेवेवर बहिष्कार टाकत निषेधाचा नवा पवित्रा सुरू केला आहे. या आगळ्या वेगळ्या निषेध आंदोलनाचे लोण कोल्हापूरसह सीमावर्ती भागात पसरले असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संधीचा फायदा घेत प्रतिस्पर्धी कंपन्यांनी नांदणी परिसरात लगोलग आपली विक्री केंद्रे थाटली असून, तेथे गर्दी होत आहे.

नांदणी ( ता. शिरोळ ) येथील जैन मठात हत्ती पालनाची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे. हा हत्ती न्यायालयाच्या आदेशाने नुकताच पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आला. हे पशुसंग्रहालय रिलायन्स उद्योगसमूहाचे अनंत अंबानी यांच्या मालकीचे आहे. हा हत्ती ताब्यात घेण्यावरून गेले दोन आठवडे कोल्हापूर आणि नांदणी परिसरात संघर्ष सुरू होता. हत्ती ताब्यात घेण्यास आलेल्या पथकाला ग्रामस्थ, भाविकांनी जोरदार विरोध केला. या वेळी पथकावर दगडफेकीचा प्रकारही झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात या हत्तीची गुजरातला रवानगी झाली.

दरम्यान, हा हत्ती गेल्यावरही नांदणी परिसरात निषेध व्यक्त होत होता. यातूनच बुधवारपासून या परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि जैन समाजाकडून संबंधित उद्योजकाच्या भ्रमणध्वनी सेवेवर बहिष्काराचे अस्र उपसले आहे. आज अनेकांनी संबंधित सेवेचा त्याग करत अन्य भ्रमणध्वनी सेवेकडे मोर्चा वळवला. याचा धसका घेतलेल्या संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी सेवा सुरू ठेवण्यासाठी आर्जव चालू केले आहे. तर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी या संधीचा फायदा घेत नांदणी परिसरात आपली तात्पुरती विक्री केंद्रे थाटली आहेत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या या केंद्राकडे आज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रिय हत्ती गेल्याचे दुःख दक्षिण महाराष्ट्र – उत्तर कर्नाटकातील भाविकांना आहे. त्यातूनच त्यांनी हे भ्रमणध्वनी सेवा बहिष्काराचे अस्र उपसले आहे. याला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. – प्रा. डी. ए. पाटील, महामंत्री दक्षिण भारत जैन सभा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महादेवी हत्तीवर भाविक, ग्रामस्थांचे अतोनात प्रेम होते. तो आता गुजरातला रवाना झाल्याने संतप्त नागरिकांनी संबंधित प्राणी संग्रहालयाचे मालक असलेल्या उद्योजकाच्या मोबाईल सेवेवर बहिष्कार घातला आहे. त्यांनी अन्य कंपन्यांची सेवा घेण्यास प्राधान्य दिले आहे. नांदणी गावात दिवसभरात सुमारे सातशे जणांनी दुसऱ्या भ्रमणध्वनी सेवा देणाऱ्या कंपनीकडे नोंद केली आहे. – वैशाली पाटील, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य.