नांदेड : मागील दोन महिन्यांपासून २० ते २३ टक्क्यांमध्ये वर-खाली होणाऱ्या विष्णुपुरी धरणाची पातळी एकाच दिवसात ३५४ मीटरवर पोहोचली. गोदावरीच्या नव्हे, तर पूर्णा नदीच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तिथून आलेल्या पाण्याने विष्णुपुरी प्रकल्प भरला आहे. प्रकल्पात ६५.३५ दशलघ मीटर पाण्याची नोंद गुरुवारी झाली. ८०.७६ टक्के साठा असून, सध्या पाण्याची आवक ४७.६३० दशलक्ष घनमीटर या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आता केव्हाही धरणाचे गेट उघडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, गतवर्षी २३ जुलै रोजी विष्णुपुरी भरले होते.

बुधवारी सकाळपर्यंत विष्णुपुरीमध्ये २३.२२ टक्केच साठा होता. पूर्णा नदीच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर दुपारी अंतेश्वर बंधाऱ्यात राखीव ठेवलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाणी आल्याने विष्णुपुरी प्रकल्पाची पातळी ३५४ मीटरवर पोहोचली. आवकही चांगली सुरू असल्याने सायंकाळपर्यंत विष्णुपुरी भरून त्याचेही गेट उघडले जाईल, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रिमझिम ते हलका व काही भागात जोरदार प्रमाणात दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू होता. तेव्हापासून गुरुवारपर्यंत पावसाची हजेरी कायम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार मंडळांत अतिवृष्टी

बुधवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस काही ठिकाणी अधिक प्रमाणात बरसला. हिमायतनगर तालुक्यातील तीन मंडळांत तर माहूर तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पैकी हिमायतनगर, जवळगाव, सरसम येथे ६७.५० तर माहूर तालुक्यातील वाई मंडळात तब्बल ८२.५० मिमी पावसाची नोंद झाली.