पेड न्यूज प्रकरण
मागील (२००९) विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी यांच्या सभेच्या जाहिरातींवर झालेला खर्च काँग्रेस आघाडीच्या त्या वेळच्या उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चात दाखविलाच नाही. यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडमधील अन्य काँग्रेस आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉ. माधव किन्हाळकर विरुद्ध अशोक चव्हाण या प्रकरणाची सुनावणी लवकरच निवडणूक आयोगासमोर सुरू होणार आहे. चव्हाण यांच्या प्रत्यक्ष निवडणूक खर्चाची व त्यांनी दाखल केलेल्या लेख्याची सत्यता या वेळी तपासली जाईल. आपण दाखल केलेला निवडणूक खर्च खरा असून, निवडणूक काळात विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या पुरवण्या व त्यावरील कथित खर्चाशी आपला संबंध नाही, असे चव्हाण यांनी सांगितले होते. चव्हाण यांच्यासह आघाडीच्या उमेदवारांनीही सोनिया गांधी यांच्या सभेनिमित्त झालेल्या वृत्तपत्रीय जाहिरातींवरील खर्च आपल्या खर्चात दाखविला नसल्याची बाब आनंद कुलकर्णी यांनी समोर आणली.
सोनियांच्या सभेचा एकूण खर्च  ७,४४,३७२ रुपये दाखविण्यात आला. पैकी १,२४,०६२ रुपये चव्हाण यांनी आपल्या निवडणूक खर्चात दाखविला. पण त्याच्या तपशीलात जाहिरातींवर एका नव्या पैशाचा खर्च दाखविला नाही. त्या सभेच्या जाहिराती प्रसिद्ध करताना चव्हाण, डी. पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, हणमंतराव बेटमोगरेकर, माधव जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, तसेच राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांची नावे जाहिरातीत समाविष्ट होती. याबाबत निवडणूक आयोगाच्या आदेशाचेही उल्लंघन करण्यात आले.

सोनिया गांधींची जाहीर सभा ६ ऑक्टोबर २००९ रोजी नांदेडला झाली. या जाहिरातींवर नेमका किती खर्च झाला, ते समोर आलेच नाही. सोनियांची सभा काँग्रेससोबतच राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ होती, हे या जाहिरातींतून स्पष्ट होते. पण त्या सभेच्या आयोजनाचा खर्च काँग्रेसच्या सहा उमेदवारांमध्ये विभागण्यात आला. सोनियांच्या सभेचा व सभेच्या जाहिरातींचा अंशत: खर्च पक्षाने केला, असे चव्हाण यांनी नमूद केले होते.