नांदेड : विधानसभेमध्ये शासनाने शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच राबविला जाईल, असे आश्वासन दिले असताना कुठलीही लेखी पूर्वसूचना न देता अचानक रेषांकनासाठी खांब रोवण्याचा शासकीय अधिकारी व ‘मोनार्क’ कंपनीचा डाव अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील बाधित शेतकऱ्यांनी गांधीगिरीच्या मार्गाने बुधवारी थांबविला.

सध्या शेतकरी हळद व गहू काढण्याच्या तयारीत असताना मोनार्क कंपनीचे प्रतिनिधी देशमुख व तलाठी वानखेडेताई यांनी भोगाव येथील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना रेषांकनासाठी आपापल्या शेतात उपस्थित राहण्याची सूचना मोबाईलवरुन शेवटच्या क्षणी दिली.

याबाबत कुठलीही अधिकृत सूचना शेतकऱ्यांपर्यंत आलेली नव्हती. पीक काढणीच्या कामात गर्क असलेल्या शेतकऱ्यांनी गांधीगिरीच्या मार्गाने शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाची प्रक्रिया राबविणार नाही, या शासनाच्या धोरणाची आठवण करुन देत आम्हाला या महामार्गासाठी जमीन द्यायची अशी ठाम भूमिका त्यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता वरिष्ठांकडे आपल्या भावना पोचविण्याचे आश्वासन देऊन रेषांकनासाठी आणलेल्या सामग्रीसह कार्यवाही थांबविली.

यावेळी भोगाव येथील बाधित शैतकरी म.रियाज, शे.जावेद युसुफुद्दीन, म.जहीर, राजाराम वलबे, देशमुख, सतीश दवणे, संघर्ष गव्हाणे, हतीमोद्दिन शेख यांच्यासह भोगावमधील बाधित शेतकऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पूर्वसूचना न देता असे धडक कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांमधील उद्रेक गंभीर स्वरुप धारण करु शकेल असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, गजानन, तिमेवार, सतीश कुलकर्णी, प्रमोद इंगोले, कचरु मुधळ, मारोती सोमवारे, सुभाष कदम, जळबाजी बुट्टे, सुभाष बुट्टे, खुर्दामोजे, पांडुरंग कदम आदिंनी दिला आहे.