दोन चुलत बहिणींचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या धावरी गावातील एका तांड्यावर घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दिव्या रुपसिंग जाधव (वय १०) आणि कोमल प्रल्हाद जाधव (वय ९) असे या दोन चुलत बहिणींची नावे आहेत. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्या शेताकडे गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी तीन वाजून गेले तरी घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, शेतातील विहिरीच्या बाजूला आणि विहिरीत त्यांना ज्वारीची कणीसं आढळून आली.

सकाळी विहीरीवर काम करताना एकही कणीस तिथं नव्हतं त्यामुळे या दोघी बहिणी कणीस घेऊन येत असताना विहिरीत पडल्या असल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर विहिरीवर दोन विद्युत पंप बसवून पाणी उपसण्यात आले त्यानंतर मध्यरात्री २ वाजता विहिरीच्या तळाला या दोन्ही बहिणीचे मृतदेह आढळून आले.

या चिमुकलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर सोमवारी (दि.१४) सकाळी अकराच्या सुमारास धावरी तांडा येथे दोन्ही बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.