अटक करण्यास गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करणारा कुख्यात विकास हटकर आणि ऋतिक पद्मावार या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश शशीकांत बांगर यांनी प्रत्येकी सात वर्षाची शिक्षा सुनावली.

विकास उर्फ विक्की सुभाष हटकर आणि ऋतिक गोपाळ पद्मावार या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची विष्णुपुरीत आणि परिसरात मोठी दहशत आहे. या दोघांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात आहे.  हटकर हा कैलास बिघानिया गँगचा सदस्य आहे. या गँगने कुख्यात विक्की चव्हाणचा खून केला होता. या खुनात हटकरचाही समावेश होता. लोहा येथील शुभम गिरी या बालकाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न त्याने केला होता.  

या प्रकरणी त्याला अटक करण्यास गेलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्याच्या पायावर गोळी घालून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. दुसर्‍या एका प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ आणि त्यांचे पथक हटकरला अटक करण्यासाठी गेले असता त्याने शस्त्राने हल्ला चढविला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही सात वर्षाच्या शिक्षेसह ३९ हजार २५० रुपयांचा दंडही सुनावला आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीमती कोकाटे यांनी काम पाहिले.