कोकणात नाणार रिफायनरी होणारच, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. वेदान्त प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का? या माध्यमांच्या प्रश्नावर नारायण राणेंनी हे उत्तर दिले आहे. ठरलेल्या ठिकाणीच नाणार रिफायनरी होणार असून या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही, असेही मुंबईत माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले आहेत. या संदर्भात काही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.

… तर काँग्रेस नाणार प्रकल्पाला विरोध करेल – नाना पटोलेंचं विधान

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प गेली सात वर्षे चर्चेत आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात १३ हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षाच्या सुरवातीला पाठवला होता. या प्रस्तावाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

‘वेदान्त’च्या मालकांची पोस्ट शेअर करत फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन लाख कोटी रुपयांची…”

‘रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) हा ६० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्रकल्प रत्नागिरीतील नाणार येथे होणार होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., हिंदूस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या भारतीय कंपन्या आणि सौदी अरामको, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी यांनी त्यासाठी सामंजस्य करार केला होता. पण, नाणार येथील भूसंपादनातील पर्यावरण व पुनर्वसनाच्या समस्येमुळे हा प्रकल्प बारगळला. आता प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातीलच बारसू परिसराचा पर्याय पुढे आला आहे. हा प्रकल्प झाल्यावर महाराष्ट्राच्या सकल राज्य उत्पन्नात ८.५ टक्के भर पडेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.