“दोन शब्द मराठीत धड बोलता येत नाही, राणेंची ठाकरेंवर टीका करायची लायकी आहे का?”

“राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्याचंही नेतृत्व करता आलं नाही”

भाजपा नेते नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे व शिवसेनेत पुन्हा एकदा खडाजंगी जुपल्याचं दिसत आहे. राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “राणेंची मूळातच दृष्टी इतकी कलुषित आहे. राजकीय प्रल्गभता त्यांच्यामध्ये अजिबातच नाही. त्यामुळे अशी फालतू टिप्पणी ते करू शकतात. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संयमी आहे,” असं म्हणत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर टीकास्त्र डागलं.

दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांच्यावर टीका केली. “राज्याचा गाडा जो हाकत असतो आणि ज्याच्यामध्ये कुशल ड्रायव्हर नसेल, तर राज्याचा गाडा चुकीच्या दिशेनं जाऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या गाडीचं ड्रायव्हिंग स्वतः केलं म्हणून त्यांच्यावर टीका करायची, याच्यासारखी दुर्दैवी बाब काहीच नाही. राणेंची मूळातच दृष्टी इतकी कलुषित आहे. राजकीय प्रल्गभता त्यांच्यामध्ये अजिबातच नाही. त्यामुळे अशी फालतू टिप्पणी ते करू शकतात. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संयमी आहे. राणेंनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या योजना त्यांनी जाहीर केल्या, एकही योजना ते पूर्ण करू शकले नाहीत. प्रत्येक योजना पाच वर्षात मी पूर्ण केली आहे. पाटबंधारे विभागाचे पाच मोठे प्रकल्प त्यांनी जाहीर केले होते. एका रुपयाचं काम झालेलं नव्हतं. सगळे प्रकल्प आज पूर्ण झालेले आहेत. लोकांना दाखवण्यासाठी काम करायचं नसते. विमानतळाची घोषणा त्यांनी केली, एक वीट तरी लागली का? त्याच्या सगळ्या अडचणी दूर करून उभारणीचं काम आम्ही पूर्ण केलं आहे,” असं म्हणत केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला.

“आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत तुम्ही टिकू शकत नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना ८० जिल्ह्यासाठी आणायचे, मी साधा राज्यमंत्री असताना २५० कोटी रुपये आणायचो. कुठे आहे तुमची शक्ती? केवळ माध्यमांना मुलाखती द्यायच्या, आपण मोठे आहोत, आपण विकासकामे केली असं भासवायचं. त्या काळामध्ये जे रस्ते झाले, ते सुद्धा सुरेश प्रभूंनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणलेले होते. स्वतःचं मेडिकल कॉलेज सुरू केलं. शासकीय मेडिकल कॉलेज का आणू शकला नाहीत. याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. कशाला महाराष्ट्राचं नेतृत्व करायच्या गोष्टी करता? सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करू शकला नाहीत,” अशी टीका केसरकर यांनी केली.

“मी जो निधी आणला, तो उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच आणला. त्या उद्धव ठाकरेंवर हे चिखलफेक करत आहेत, यांची लायकी तरी आहे का? यांना धड दोन शब्द मराठीमध्ये स्वच्छ बोलता येत नाही. यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी नेतृत्वावर ज्यांनी बाळासाहेबांनंतर शिवसेना टिकवली. बाळासाहेब असतानासुद्धा जितके आमदार निवडून आले नव्हते, तेवढे त्यांनी निवडून आणून दाखवले. कशाच्या बळावर? भाजपासोबत नसताना आणून दाखवले. शेवटी त्यांना बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांना स्वतः कधीही मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करायचा होता. शरद पवारांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. भाजपाने दिलेला शब्द पाळला असता, तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते. तुम्ही शब्द दिला, तो पाळा इतकी अपेक्षा करणं चुकीचं आहे का?,” असा सवाल केसरकर यांनी भाजपाला केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narayan rane deepak kesarkar uddhav thackeray maharashtra politics bmh

ताज्या बातम्या