रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार बदलण्यासाठीच देशात मोदींची लाट निर्माण झाली असून, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी मिरज येथे झालेल्या सभेत सांगितले. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेत पर्रीकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, दीपक िशदे, मकरंद देशपांडे, नगरसेविका स्वरदा केळकर आदी उपस्थित होते.
या वेळी पर्रीकर म्हणाले, की यूपीए सरकारमधील आíथक घोटाळय़ामुळे केंद्र शासनाची तिजोरी रिक्त झाली आहे. परिणामी, विकासकामांना निधीच उपलब्ध नाही. एलबीटीमुळे व्यापारी उद्योजक त्रस्त आहेत. तर महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळते आहे. याला पर्याय म्हणून नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भाजपने नेतृत्व पुढे केले असून युवावर्गाचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसप्रणीत सरकारवरील चीड आणि परिवर्तनाची लाट यामुळे सत्ताबदल अटळ आहे.
सभेनंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर म्हणाले, की महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची परमावधी गाठली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शासनकत्रे भ्रष्टाचारात केवळ दादागिरीच करतात असे नसून व्यावसायिकीपणातून पार्टनरशिप मागत आहेत. विजेचे दर गोव्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील आघाडी शासन परीक्षेला बसण्यास लायक नसल्याने यश-अपयश दूरची गोष्ट असल्याचे सांगत सिंधुदुर्गमधील नारायण राणे यांच्या विरोधातील उद्रेक हा भ्रष्टाचारांतर्गत हिस्सेदारीतून झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यास आपण दिल्लीत जाण्याऐवजी गोव्यातच कार्यरत राहण्यास प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.