Narendra Jadhav on Hindi Language Imposition : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने इयत्ता पहिलीपासूनच मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती केली होती. फडणवीस सरकार तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा रेटत होतं. मात्र, या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सरकारने हिंदी भाषा शिकण्याच्या सक्तीबाबतचा निर्णय मागे घेतला. मात्र, त्यांनी माजी खासदार व अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. ही समिती केंद्र सरकारचं शालेय शिक्षण धोरण राज्यात कसं लागू करणार, कोणत्या भाषा शिकवायला हव्यात यावर अभ्यास करून एक अहवाल राज्य सरकारपुढे सादर करेल आणि त्यानंतर सरकार त्रिभाषा सूत्राबाबतचा निर्णय घेईल.
दरम्यान, डॉ. नरेंद्र जाधव यांनी तीन भाषांचा वाद कसा मिटणार? यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “मी सरकार, शिक्षण विभाग व विविध विद्यापीठांकडून माहिती मागवली असून त्रिभाषा सूत्रावर व शैक्षणिक धोरणावर अभ्यास सुरू केला आहे. आमच्या समितीमधील सदस्य देखील ठरले आहेत. मात्र, त्यांची घोषणा झालेली नाही. या आठवड्याच्या अखेरिस समितीतील सदस्यांची घोषणा केली जाईल.”
तीन भाषा शिकणं अनिवार्य नाही : जाधव
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष म्हणाले, “तीन भाषा व हिंदी भाषेच्या सक्तीवरून वाद चालू असतानाच दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. संसदेत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने सांगितलं की आम्ही कुठेही भाषांची सक्ती केलेली नाही. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं बंधनकारक नाही. ही टिप्पणी खूप महत्त्वाची आहे. कारण लोकांनी गृहित धरलं होतं की आता तीन भाषा शिकवल्या जाणार, तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याची सक्ती केली जाणार.”
…अन् विद्यार्थी धेडगुजरी भाषा बोलू लागतात : डॉ. नरेंद्र जाधव
“यापूर्वी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाशी सुसंगत अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. सर्वांना वाटलं होतं की माझी समिती डॉ. माशेलकरांच्या समितीच्या अभ्यासावर शिक्कामोर्तब करेल आणि तीन भाषा शिकण्याची सक्ती केली जाईल. मात्र, तसं होणार नव्हतं. कोवळ्या वयात, बालवयात मुलांना तीन भाषा शिकायला लावणं हा त्यांच्यावरील अत्याचार आहे.
ते खेळताना किंवा संभाषणातून भाषा शिकू शकतात. मात्र, त्यांना पुस्तक व वही दिली, अभ्यास करायला लावला, लिहायला लावलं तर त्यांची पंचाईत होते. कारण प्रत्येक भाषेचं व्याकरण वेगळं असतं. त्यातून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. ते धेडगुजरी भाषा बोलू लागतात.”This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नरेंद्र जाधव म्हणाले, “इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला तर मुख्य गोष्टी सोडून इतर विषयांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या घोकमपट्टीवर भर दिला जातो. जे टाळणं आवश्यक होतं. माझ्या समितीत ते पुढे आलंच असतं. मात्र, सुदैवाने केंद्र सरकारने ही गोष्ट आधीच स्पष्ट केली आहे.”