भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी रविवारी, ५ जानेवारीला रायगड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर होणार असून या कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसलेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
शिव प्रतिष्ठानने २ जानेवारीला पायी मोहिमेला सुरुवात केली. ४ जानेवारीला सर्व शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर दाखल होतील. रविवारी या मोहिमेचा समारोप होईल. या निमित्ताने रायगड किल्ल्यावर नरेंद्र मोदी येणार आहेत. शिवरायांना अभिवादन करून ते उपस्थित जनसभेला संबोधित करतील. पुणे विमानतळावरून सकाळी हेलिकॉप्टरने मोदी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील हेलिपॅडवर उतरतील. मोदी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर येणार असल्याने येथे प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे.

गडाचे दरवाजे बंद
 नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचे कारण पुढे करत उद्यापासून रायगडाचे दरवाजे सर्वसमान्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांमधे नाराजीचा सुर आहे.पुढील तीन दिवस गडाच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात पोलीस आणि रायगड पोलीसाच्या ताब्यात असणार आहे. यासाठी गुजरात पोलीसांचे पथक रायगडमधे दाखल झाले आहे. कार्यक्रमाचे आयोजक आणि गुजरात पोलीस सांगतील त्यांनाच गडावर प्रवेश दिला जाईल असा फतवा काढण्यात आला आहे.