केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार सत्तेत येणार असून त्यात तीळमात्र शंका नाही. नव्या मंत्रिमंडळात कोणाला कोणते स्थान द्यावे, याचा अधिकार नरेंद्र मोदी यांनाच राहणार आहे. लालकृष्ण अडवाणी हे रालोआचे मार्गदर्शक असतील. त्यांच्याविषयीची अंतिम भूमिका मोदी हेच घेतील, असे भाजपचे कर्नाटकातील नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीनंतर बुधवारी सकाळी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अनंतकुमार हे सहकुटुंब आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, सोलापूरशी आपले भावनिक नाते असून ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन जाताना पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडू, असे नमूद केले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख, अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील आदी उपस्थित होते.
देशात रालोआचे सरकार सत्तेत येणार असल्याचे जवळपास सर्व प्रसारमाध्यमांनी केलेले भाकीत पाहता समस्त जनतेच्या मनात काँग्रेसच्या विरोधात प्रचंड खदखद असल्याचे चित्र दिसून येते. त्याचेच प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येईल, असा दावा अनंतकुमार यांनी केला. मोदी सरकारमध्ये लालकृष्ण अडवाणी यांची नेमकी कोणती भूमिका असेल, या थेट प्रश्नावर बोलताना अनंतकुमार यांनी, मोदींनी यापूर्वीही अडवाणी यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यांच्याविषयीची अंतिम भूमिका मोदी हेच घेतील, असे स्पष्ट केले.
उत्तर भागात मोठी ताकद असलेल्या भाजपला दक्षिणेत लोकसभेच्या जेमतेम पाचपर्यंत जागा मिळत होत्या. परंतु यंदा पक्षाची ताकद वाढणार असून दक्षिणेत किमान ५० जागांपर्यंत मजल गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.