सांगली, कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा बुधवारी सकाळी ११ वाजता सांगलीत होणार असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम सोमवारी पत्रकार बैठकीत जाहीर करण्यात आला.  मोदी यांच्या सभेसाठी संजय भोकरे कॉलेजच्या मदानावर जय्यत तयारी सुरू असून राष्ट्रीय कमांडोचे एक पथक व गुजरात पोलिसांचे एक पथक सांगलीत दाखल झाले आहे.
मोदी यांच्या दौ-याची माहिती देताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद देशपांडे व नीता केळकर यांनी सांगितले की, बडोदा लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर मोदी विमानाने थेट कोल्हापूर येथे येणार आहेत.  तेथून हेलीक ॉप्टरने सांगलीस येणार असून दुपारी १ वाजता त्यांची सभा सुरू होईल.  त्यानंतर सोलापूर व लातूर या ठिकाणी मोदी यांच्या सभा होणार आहेत.  त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे, सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगले येथील राजू शेट्टी व चिक्कोडी येथील उमेश कट्टी हे व्यासपीठावर असतील.  या सभेसाठी दीड लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज असून भोकरे कॉलेजचे विद्यार्थी त्यांचे स्वागत करणार आहेत.
महायुतीच्या प्रचारापासून अलिप्त राहिलेले सांगलीचे आमदार संभाजी पवार मोदी यांच्या सभेस उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून घटक पक्षाच्या नेत्यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात आले आहे.  सभेसाठी महिला, युवक व अन्य अशी त्रिस्तरीय बठक व्यवस्था करण्यात आली असून आजच मदानाचा ताबा गुजरात पोलिसांनी घेतला असून सांगली पोलीसही बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.