विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचादेखील समावेश होता. परंतु पहिल्या रांगेत असूनही खडसे यांना मात्र भाषणाची संधीच मिळाली नाही. त्यामुळे आता याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ खडसे यांनी अनेकदा विरोधकांना घेरण्याचं काम केलं आहे. तसंच अनेकदा त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवरही निशाणा साधला होता. नाशिकमध्ये आयोजित या सभेत उपस्थित असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु त्यांना भाषणाची संधीच मिळाली नाही. खासदार भारती पवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, गिरीश महाजन अशा अनेकांनी मंचावरून आपली मतं मांडली. परंतु एकनाथ खडसे यांना प्रतीक्षाच करावी लागल्याचं पहायला मिळालं.
या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.