नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बाल वेठबिगारीमागील सूत्रधारांचा शोध घेऊन आदिवासी कुटुंबांना शाश्वत स्वरुपाचा रोजगार मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाला केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील १८ पेक्षा अधिक मुलांची वेठबिगार म्हणून नाईलाजास्तव पालकांकडूनच विक्री करण्यात आली आहे. त्यातील आठ जणांची सुटका करण्यात आली. परंतु, दहा वर्षांच्या या मुलीला जीव गमवावा लागला. या घटनेची दखल घेत डॉ. गोऱ्हे यांनी राज्य शासनाला काही सूचना केल्या आहेत.

“नाशिक आणि अहमदनगर भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकले. अशा प्रकारच्या घटना घडवून आणणारे कोणी समाजकंटक नियोजनबध्द काम करत आहेत काय, याचा तपास करण्यात यावा, आदिवासी भागात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी आदिवासी कुटुंबाना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य सल्लागार समितीच्या वतीने राज्यातील आदिवासी कुटुंबांचा रोजगार, शिक्षण, कृषी विकास आदी मुद्यांसंदर्भात विचार करण्यात यावा.” अशा सूचना नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज नीलम गोऱ्हे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन आणि पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आदिवासी विकास विभाग आयुक्तांसह अप्पर आयुक्त संदिप गोलाईत यांच्याशी चर्चा केली. पोलीस यंत्रणेकडून योग्य तो अहवाल सादर करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांना आश्वासन दिले आहे.