संगमनेर : विपरीत परिस्थितीतही मनोधैर्य खचू न देता आलेल्या संकटावर मात करण्याचा आणि त्यातून पुरुषार्थ गाजवण्याचा मंत्र देणारी श्रीमद् भगवद्गीता म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीच आहे. जीवनात कशाचा अंगीकार करावा आणि कशाचा त्याग करावा या विषयीचा अनमोल उपदेश गीतेने दिला आहे. माणसाचे जीवन पाण्यावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे क्षणभंगुर असते. त्यामुळे ‘मी’ पणाचा, अहंकाराचा त्याग करून मनाचे समत्त्व कसे साधता येईल, याचे मार्गदर्शन गीता करते. भगवद्गीता कोणत्या एका विशिष्ट जाती अथवा धर्मासाठी नसून, संपूर्ण विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचे रहस्य त्यात दडल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गीता विशारद डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
राजस्थान युवक मंडळाचे अमृतमहोत्सवी स्थापना वर्ष आणि श्रावणमासाचे औचित्य साधून संगमनेरात आयोजित त्रिदिन व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना ‘विषादाकडून विवेकाकडे’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी भावयात्रा’ या विषयावर ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सुमीत अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, कृष्णा आसावा, वेणुगोपाल कलंत्री आदी उपस्थित होते.
गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ‘सांख्ययोगा’चे डॉ. मालपाणी यांच्या अत्यंत सोप्या आणि रसाळ वाणीतून निरुपण श्रवताना श्रोते अंतर्मुख झाले होते. माणसाच्या जीवनात विषादरुपी दुःख वेगवेगळ्या कारणांनी येतच असते. ज्याच्या वाट्याला दुःखच आले नाही, अशी व्यक्ती या भूतलावर नसल्याचे सांगत त्यांनी दुःखाला कवटाळून बसल्याने माणसाच्या जीवनावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे सांगितले. ज्यावेळी प्रगती खुंटते, जगणे निरर्थक वाटू लागते अशा गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत न डगमगता स्वतःला सावरून जीवनाचे सार्थक कसे करावे, याचे सखोल मार्गदर्शन गीता करते. याच बळावर विषादावर मात करण्यासाठी श्रीमद् भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. त्यातून मिळालेल्या उभारीवर, उमेदीवर प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्माचे आणि आयुष्याचे सार्थक करू शकते, असेही डॉ. मालपाणी यांनी यावेळी बोलताना सांगितले. सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन सुमित अट्टल यांनी मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी शिवतांडव स्तोत्राच्या तालावर कठीण आसनांचे लक्षवेधी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
समाज माध्यमांवर नियंत्रण हवे
समाज माध्यमांवर वेळीच नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. या माध्यमातून चांगल्या गोष्टींपेक्षा विकृतीचाच प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. कुटुंबांना हानीकारक असलेल्या या माध्यमाचा समाजविघातक आणि राष्ट्रविघातक प्रवृत्तींकडूनही मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी या माध्यमावर निर्बंध लागू करून नियमांच्या अधिन राहूनच त्याला परवानगी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. याच व्याख्यानमालेतील दुसऱ्या व्याख्यानात ते बोलत होते.