Nana Patole Criticize Ajit Pawar : “जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता महाविकास आघाडीतच अंतर्गत वाद सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार काय म्हणालेत?

“आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा >> “महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ”, अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “सगळ्यांची डीएनए टेस्ट…”

नाना पटोलेंचं प्रत्युत्तर काय?

“सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे. कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, इतकी मोघम प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोलेंचे सरकारवरही टीकास्त्र

“या बजेटमध्ये हजारो कोटी रुपये फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातींसाठी दिले होते. हे सरकार रडत्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा आपले हसरे चेहरे लावून योजनांच्या घोषणांचे पाऊस पाडून लोकांच्या जमखेवर मीठ टाकण्याचं काम करतंय. सरकार दारी काय कुठेच राहणार नाही, अशा प्रकारचे हे सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे”, अशी टीकाही नाना पटोलेंनी यावेळी सरकारवर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांचाही पवारांवर पलटवार

“सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरतंय हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.