भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर रेवसजवळील मोरापाडा येथे गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कोसळले. यात चार वैमानिक जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाचे चेतक ४१७ हे हेलिकॉप्टर आपल्या दैनंदिन प्रशिक्षणासाठी मुंबई येथील नौदल तळावरून उडाले होते. या वेळी रोहित कुमार, विनेश कुमार हे दोन एअर कृमेंबर आणि कमांडर चैतन्य आणि कमांडर श्रीधर हे दोन वैमानिक हेलिकॉप्टरमध्ये होते. नियमित उड्डाण केल्यानंतर हे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराजवळ आले. या ठिकाणी मोरापाडा येथे असलेल्या नौदलाच्या तळावर हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक हेलिकॉप्टर कोसळले.
 ही घटना या परिसरातील तीन मच्छीमारांनी पाहिली आणि तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुराख्याच्या मदतीने हेलिकॉप्टरमध्ये अडकलेल्या चौघांनाही मच्छीमारांनी बाहेर काढले. यातील दोन जण गंभीररीत्या जखमी झाले होते. तर बाकी दोघे किरकोळ जखमी झाले होते. जखमी वैमानिकांनी अपघाताची माहिती मुंबईत कळवली. त्यानंतर चौघांनाही नौदलाच्या दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या मदतीने मुंबईत उपचारासाठी हलविण्यात आले.  
दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचा अंदाज नौदलाने व्यक्त केला आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार आणि अलिबागचे तहसीलदार विनोद खिरोळकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हेलिकॉप्टरचा पंखा तुटल्याने अपघात झाल्याचे स्थानिक मच्छीमारांनी या वेळी तहसीलदार खिरोळकर यांना सांगितले. मोरापाडा येथे नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी याच ठिकाणी नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
नौदल अधिकाऱ्यांची स्थानिकांना दमदाटी
अपघाताचे वृत्त समजताच आसपासच्या परिसरातील लोक घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात दाखल होत होते. माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकारही या ठिकाणी पोहोचले होते. या वेळी नौदल अधिकाऱ्यांनी स्थानिकांना दमदाटी करीत हुसकावून लावले. तर माध्यमाच्या प्रतिनिधींनाही छायाचित्रण करण्यास रोखले. छायाचित्रण करणाऱ्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy helicopter crashes near revas alibaug
First published on: 19-09-2014 at 04:01 IST