राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझी तर भूमिका स्पष्ट आहे. कुख्यात गुन्हेगार असतील, दहशतवादी असतील तर त्यांना तुरुंगात ठेवलंच पाहिजे. पण जामीन लोकांचा अधिकार असतो, म्हणजे ही पळून जाणारी लोक नाहीत. कधीही कुठल्याही तपासामध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा ते हजर होवू शकतात. अशा लोकांना तुरूंगात ठेवून केवळ पब्लिसिटी करून घेणं हा उद्योग समीर दाऊद वानखेडेचा सुरू होता. यापुढे बऱ्याच केसेस आहेत, ज्या समीर वानखेडेने तयार केलेल्या आहेत. त्या कशा बोगस आहेत, याचे पुरावे आम्ही सगळे शोधून काढलेले आहेत.” असं नवाब मलिक म्हणाले आहेत. गोंदिया येथे ते माध्यमांशी बोलत होते.

तसेच, नवाब मलिक म्हणाले की, “सोशल मीडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील, असं वाटत असेल तर, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही. या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत, ते सोशल मीडियावर लाल गाठोडे दाखवत आहेत, असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत आहेत.”


याचबरोबर, “मी भंगारवाला आहे… अशा रद्दी माझ्याकडे दहा – वीस आणि शंभर टन आहेत. आम्ही चोर नाही… आम्ही डाकूकडून सोनं घेतलं नाही… बँका बुडवल्या नाहीत… त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे? कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे? त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या? क्रुझवरील कॅटरिंगमध्ये ड्रग्ज कसे गेले. आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे? इतकं का घाबरताय.” असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.