scorecardresearch

“नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच पुरावे देणार”; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केलाय.

“नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, लवकरच पुरावे देणार”; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. मात्र त्यासोबतच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीसांनी केला आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपल्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल.

ताज्या आणि लाईव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

“चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.

त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या