आर्यन खान प्रकरणात प्रकरणाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आणखी काही आरोप केले आहेत. दरम्यान त्यानंतर नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केलं होतं. यामुळे आता कोणते नवे आरोप आणि खुलासे होत आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. SPECIAL 26 असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी आपण लवकरच रिलीज करतोय असं म्हटलं होत. यावेळी नवाब मलिक यांनी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवलं असून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचंही सांगितलं होत.
दरम्यान, एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासाबाबत या पत्रात माहिती आहे. त्यामुळे आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी असे नवाब मलिक यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोटे प्रकरण केली तसेच खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मलिक यांनी या निनावी पत्रासह एनसीबीच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली. त्यानंतर आता पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत.