नाडेकलच्या जंगलात चकमक, नक्षली पसार
नाडेकलच्या जंगलात नक्षलवादी व पोलीस दलात चकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घटनास्थळाहून पसार झाल्यानंतर पोलिसांनी राबविलेल्या सर्च अभियानात नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
गावामध्ये नक्षल असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोटगुल हद्दीतील नाडेकल गावाशेजारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व विशेष अभियान पथक गडचिरोली नक्षल विरोधी अभियान राबवित असताना रात्री १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान पोलीस-नक्षल चकमक झाली. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.
पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी आपल्या जवळील साहित्य घटनास्थळीच टाकून अंधार व जंगलाचा फायदा घेऊन पळून गेले. दरम्यान, चकमकीनंतर घटनास्थळाचा शोध घेतला असता पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षली साहित्य १ एसएलआर रायफल, एक १२ बोर रायफल, १ एसएलआर मॅग्झीन, २ एके रायफल मॅग्झीन, १६ नग एसएलआर जिवंत काडतूस, दोन नग १२ बोर काडतूस, एक क्लेमर माईन, २ पिट्ट, लोखंडी खिळे, औषधी व लिखित साहित्य तसेच रोजच्या दैनंदिन वापराचे मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. नाडेकलसोबतच लगतच्या परिसरातही पोलिसांनी सर्च अभियान सुरू केले असून नक्षलवाद्यांची एकप्रकारे जंगलातच कोंडी केली जात आहे.