देशभरात सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांनी येत्या २१ सप्टेंबरला विलिनीकरणाची दशकपूर्ती धडाक्यात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तेलंगण राज्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रचारासाठी नक्षल समर्थकांनी सोशल साईटस्वर भर दिला आहे.
नक्षलवाद्यांचा भाकप माओवादी हा पक्ष असून, या पक्षाची स्थापना २००४ च्या सप्टेंबरमध्ये झाली. तेव्हा देशात विविध गटांत विखुरलेल्या नक्षलवाद्यांनी अबूजमाड पहाडावर महासभा भरवून सर्व गटांचे विलिनीकरण घडवून आणले होते. त्यावेळी हा पक्ष स्थापन करण्यात आला. आता या विलिनीकरणाला १० वर्ष पूर्ण झाली असून, या दशकपूर्तीचे निमित्त साधून नक्षलवाद्यांनी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी चर्चात्मक कार्यक्रम घेण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय समितीने गेल्या एप्रिलमध्ये दिले होते. त्यानुसार पहिला कार्यक्रम नक्षलवाद्यांनी नव्याने निर्माण झालेल्या तेलंगण राज्यात आयोजित केला आहे.
क्रांतिकारी चळवळीची दहा वर्षे तसेच या चळवळीकडून देशात नवा राजकीय पर्याय शोधण्यासाठी चर्चेचे आयोजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. बघलींगपल्लीतील सुंदरय्या केंद्रात सकाळी ११ वाजता एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यात नक्षलसमर्थक म्हणून ओळखले जाणारे अमित भट्टाचार्य, सीएसआर प्रसाद व कवी वरवराराव यांची भाषणे होणार आहेत. दुपारी ४ वाजता इंदिरा पार्कमध्ये जाहीर सभेचे आयोजन नक्षलवाद्यांनी केले असून, यात बोज्जा तरकम, कांचनकुमार, प्रा. हरगोपाल, प्रा. के.आर. चौधरी, चलसानी प्रसाद, आर. नारायणमूर्ती व पद्मकुमारी यांना वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या सभेला सर्व समर्थक व जनतेने हजर रहावे, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा नेहमी विरोध करणाऱ्या नक्षलवाद्यांनी, तसेच त्यांच्या समर्थकांनी या कार्यक्रमाचा जोरदार प्रसार सोशल साईटस्वरून चालवला आहे. कार्यक्रमाची माहिती असलेले फलक या साईटस्वर झळकू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal celebrates 10 years completion of telangana inclusion
First published on: 04-09-2014 at 04:46 IST