सध्या तुरुंगात असलेले जहाल नक्षलवादी प्रशांत राही व हेम मिश्रा यांच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर नक्षलवाद्यांच्या जगभरातील समर्थकांनी सध्या पत्रांचा पाऊस पाडणे सुरू केले आहे. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांना आतापर्यंत हे दोघे निर्दोष आहेत असे सांगणारी २० हजार पत्रे आली आहेत.
मूळचा नाशिकचा असलेला पण उत्तराखंडमध्ये सक्रिय असलेल्या प्रशांत राही उर्फ सांगलीकरला तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या आधी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या हेम मिश्राला पोलिसांनी पकडले होते. हे दोघेही अबुजमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जात होते, असा पोलिसांचा आरोप आहे. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील इंग्रजीचे प्राध्यापक जी. एल. साईबाबा यांच्या घराची झडती घेतली होती. या प्रकरणाचा तपास करणारे अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास बावचे यांना सध्या वेगळय़ाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चळवळीशी संबंधित कुणालाही अटक झाली की त्याचा वेगवेगळय़ा माध्यमातून गवगवा करण्याच्या तंत्रात नक्षलवादी तरबेज आहेत. मिश्रा व राही यांना अटक होताच आता या चळवळीच्या जगभरातील समर्थकांनी बावचे यांना पत्र पाठवण्याचा उद्योग सुरू केला आहे.
देशात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांचे जगभरातील अनेक फुटीरतावादी संघटनांशी तसेच मानवाधिकाराशी संबंधित संस्थांशी चांगले संबंध आहेत. त्याचा वापर करत पत्रांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयोग नक्षलवाद्यांनी सुरू केला आहे. त्यांना रोज पत्रांचा एक गठ्ठा टपाल खात्यामार्फत येतो. विशेष म्हणजे यातील ६० ते ६५ टक्के पत्रे नेदरलँड या एकाच देशातून आलेली आहेत. उर्वरित पत्रे वेगवेगळय़ा देशातून आलेली आहेत. जगाच्या पाठीवरील एकही देश नक्षलवाद्यांनी सोडलेला नाही, असे बावचे यांनी बुधवारी सांगितले. विशेष म्हणजे या पत्रांतील मजकूर सारखा आहे. या कारवाईची माहिती इंटरनेटवर टाकताना नक्षलवाद्यांनी बावचे यांच्या नावाचे स्पेलींग चुकीचे लिहिले. त्यांना मिळालेल्या प्रत्येक पत्रात बावचे यांचे नाव चुकीचे लिहिले आहे. पत्रांच्या या गठ्ठय़ांमुळे बावचे यांच्या कार्यालयातील एक खोली पूर्णपणे भरली आहे.
केवळ अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेला दिलेले उत्तर वगळता इतर कोणत्याही पत्राची आपण दखल घेतली नाही, असे बावचे यांनी सांगितले. या पत्रांच्या वर्षांवामुळे जगभरातील टपाल तिकिटांचा संग्रह माझ्य़ाजवळ आपसूकच झाला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.