जनाधार गमवत चाललेल्या नक्षलवाद्यांमध्ये आता अंतर्गत भांडणासोबतच एकमेकांच्या निष्ठेवर संशय घेण्याचे प्रकार सुरू झाले असून, राज्य समितीचा सचिव दीपकने या संदर्भात विभागीय सचिव पहाडसिंगला लिहिलेले एक पत्रच पोलिसांच्या हाती लागले आहे. यात जहाल नक्षलवादी गोपीवर संशय घेण्यात आला असून, त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना दीपकने केली आहे.
काही दिवसापूर्वी अबूजमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची बैठक या चळवळीचा प्रमुख गणपतीच्या उपस्थितीत झाली. बरेच मंथन झाल्यानंतर गणपतीने या बैठकीचा वृत्तांत सर्व सदस्यांना वितरीत केला. यात चळवळ वेगाने जनाधार गमवत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर आता या चळवळीला अंतर्गत वाद तसेच संशयाने ग्रासले असल्याचे दिपकच्या या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. राज्य समितीचा सचिव असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ दीपक कायम उत्तर गडचिरोलीच्या जंगलात वास्तव्य करून असतो. दीपकने उत्तर विभागाचा सचिव पहाडसिंगला पाठवलेल्या पत्रात या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गोपीच्या वर्तनावर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. विभागीय समितीचा सदस्य असलेला गोपी गेल्या काही महिन्यांपासून चळवळीच्या विरोधात काम करणाऱ्या तत्वांशी संबंध ठेवून आहे, असा आरोप दीपकने या पत्रात केला आहे.
गोपीची वर्तणूक व लक्षण ठीक नसून तो केव्हाही पोलिसांकडे आत्मसमर्पण करू शकतो अशी शंका दीपकने या पत्रात व्यक्त केली आहे. चळवळीच्या उद्दीष्टांच्या मुद्यांवरून दलममधील सहकाऱ्यांशी भांडणे उकरून काढणारा गोपी आता त्याच्या कामाला कंटाळलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. विभागाचा सचिव म्हणून पहाडसिंगने ही कामगिरी बजवावी, असेही दीपकने या पत्रात म्हटले आहे.  हेच पत्र गडचिरोली पोलिसांच्या हाती लागले आहे. गेल्या जुलै महिन्यात एटापल्ली तालुक्यातील  मेंढेर गावाजवळ झालेल्या चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. चकमकीनंतर घटनास्थळावरून पोलिसांनी बरीच कागदपत्रे जप्त केली. यात हे पत्र सापडल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या पत्रामुळे या चळवळीत सुद्धा आता ज्येष्ठ सदस्य एकमेकांवर संशय घेऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे, असे कदम म्हणाले.
केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर गणपतीने जारी केलेल्या पत्रात संपूर्ण दंडकारण्य भागात उत्तर गडचिरोली गोंदिया विभागाची कामगिरी चांगली नसल्याचे मत व्यक्त केले आहे. या विभागात अजूनही चळवळ मूळ धरू शकली नाही, असे गणपतीने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर गोपीविषयीचे हे पत्र समोर आल्याने या चळवळीत आता बरेच वाद सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दक्षिण गडचिरोलीत सुद्धा विभागीय सचिव ऐतू व जहाल नक्षलवादी नर्मदामध्ये वाद सुरू झाला आहे. खनिज उत्खननाला परवानगी देण्याच्या मुद्यावरून सुरू झालेला हा वाद आता केंद्रीय समितीकडे गेला आहे. गेल्या काही महिन्यात गडचिरोली पोलिसांनी २३ नक्षलवाद्यांना ठार मारत प्रभावी कामगिरी बजावल्याने नक्षलवादी अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच हे वाद व संशयाचे प्रकार जन्म घेत आहेत असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.