सहा महिन्यांत ३३ जणांना तुरूंगात डांबले नक्षलवादी प्रवक्ता श्रीनिवास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने जंगलात दडपशाही सुरू केली असून गेल्या सहा महिन्यात उत्तर गडचिरोलीत १५५, दक्षिण गडचिरोलीत १५३, अशा ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली, तर ३२ आदिवासींना नक्षलवादी ठरवून कारागृहात डांबले आहे. गेल्या सात वर्षांत ६० नक्षल क्रांतिकारकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) पश्चिम सब झोनल दंडकारण्य स्पेशल झोन ब्युरो उत्तरदक्षिण गडचिरोलीचा प्रवक्ता श्रीनिवासने केला आहे.

श्रीनिवासने लोकसत्ताला पाठविलेल्या पत्रात जलजंगलजमीन यावर संपूर्ण अधिकारासाठी संघर्षरत जनतेवर राज्य व केंद्रातील हिंदू कट्टरवादी सत्ताधाऱ्यांकडून कसा अन्याय, अत्याचार सुरू आहे, हे नमूद केले आहे. नक्षलवाद व माओवादाच्या नावावर अतिदुर्गम भागातील आदिवासींना अक्षरश: अंगावरचे कपडे काढून तिखटमीठ चोळून पोलिसांकडून मारहाण व ऑपरेशन ग्रीन हंट अंतर्गत ‘माओवादरहित गडचिरोली’, ‘नक्षलमुक्त गडचिरोली’, ‘दादामुक्त गडचिरोली’ या नावावर आदिवासींवर अन्याय केला जात आहे. गडचिरोलीतील आदिवासींनी सुरजागड व दमकोंडी क्षेत्रातील लोह उद्योगाला विरोध करून ‘जान देंगे पर पहाड नही देंगे’ हा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. मात्र, गडचिरोली पोलिस आदिवासींवर अत्याचार करीत असल्याचा आरोपही श्रीनिवासने केला आहे.

गडचिरोली पोलिस दलाने जानेवारी २०१६ ते जून २०१६ दरम्यान ३०८ आदिवासींना बेदम मारहाण केली. उत्तर गडचिरोलीच्या १५५, तर दक्षिण गडचिरोलीच्या १५३ आदिवासींना इतकी मारहाण केली की, त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. या मारहाणीचा आकडा यापेक्षाही अधिक असल्याचा दावाही या पत्रातून केला आहे. विशेष म्हणजे, श्रीनिवासने गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी मारहाण केलेल्या आदिवासींची नावे, तो कुठल्या गावातील, कोणत्या तालुक्यातील आहे व कोणत्या तारखेला मारहाण झाली, याचा सविस्तर लेखाजोखाच माध्यमांकडे पाठविला आहे. इतकेच नाही, तर गेल्या काही महिन्यांमध्ये ३२ आदिवासींना नक्षलवादी ठरवून कारागृहात डांबल्याचा आरोपही यात केला आहे. यातील १७ जणांना चंद्रपूरच्या कारागृहात, ८ जण नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात, तर ४ जण कांकेर, ३ जण दुर्ग व दोघांना भंडारा कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. गेल्या सात वर्षांत पोलिसांनी ६० क्रांतिकारकांची निर्घृण हत्या केल्याचा आरोपही केला आहे.

महाराष्ट्रतेलंगणा व महाराष्ट्रछत्तीसगड पोलिस दलाच्या संयुक्त अभियानात कांकेर, कारका, कुडकेली, ओरेकस्सा, काटेपल्ली येथील बनावट चकमकीत अनेकांच्या हत्या घडवून आणल्या आहेत. गडचिरोलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश रेड्डी यांनी भित्रेपणाने काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कमांडो पोलिसांनी या परिसरातील अनेक घरांना आगी लावल्या. कॉ. राहुल हा पोलिसांना धुळ चारून निघून गेला. मात्र, कॉ. रजिता हिने पोलिसांशी लढतांना कुर्बानी दिली, असाही यात उल्लेख आहे. गडचिरोली पोलिस कॉ. दिनकरच्या भावाला बडा झेलिया गावात जाऊन सर्वांसमक्ष मारहाण केली जात असून त्याच्या घरात घुसून जेवणाचे ताट, पिण्याचे पाणी फेकून दिले, तसेच कुऱ्हाड, फावडे, नांगर व इतर साहित्याची नासधूस केली. स्थानिक आदिवासींनी पोलिसांच्या या मारहाणीविरुध्द लढा पुकारण्याचे आवाहनही त्याने केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites attack in gadchiroli district
First published on: 08-07-2016 at 00:32 IST