गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापुरच्या माढा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान कापसेवाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला त्यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांची व शेती क्षेत्राची परिस्थिती यावर सविस्तर भाष्य केलं. तसेच, शेती क्षेत्राच्या समस्यांवरील उपाय सांगतानाच सरकारवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यावेळी त्यांनी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख करताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
शरद पवार यांनी या मेळाव्यात केलेल्या भाषणाचं शब्दांकन त्यांच्या एक्सवरील (ट्विटर) अधिकृत हँडलवर पोस्ट केलं आहे. यामध्ये शेती क्षेत्राविषयी मांडलेली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
इंदिरा गांधी जेव्हा सोलापुरात आल्या होत्या…
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री असताना उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा उल्लेख पवारांनी पोस्टमध्ये केला आहे. “सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळी पाहणी करायला इंदिरा गांधी याठिकाणी आल्या होत्या आणि कधीही न पाहिलेले एवढे मोठे संकट तेव्हा आम्ही पाहिले. ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करण्यासाठी जात होते त्यांचा पगार आणि बाकीची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्रीच्या ३-३ वाजेपर्यंत बसावे लागत असत या सर्वांचा आठवड्याचा पगार काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी अनेक सहकारी मदतीला होते”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“मी कुठेच नसलो, तरी सर्व ठिकाणी आहे!”
दरम्यान, यावेळी आपण केंद्रात किंवा राज्यात सत्तेत कुठेच नसलो, तरी आपण सगळीकडे असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. “राज्य, केंद्र सरकारच्या संबंधित इथे अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण यापैकी मी कुठेच नाही परंतु काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे, जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे-जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला राज्य व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलावे आणि त्यातून तुमची सुटका कशी होईल यासंबंधी चर्चा करेन”, असं पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मोदी-शाहांना टोला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यावेळी शरद पवारांनी टोला लगावला. “देशाचे प्रधानमंत्री यांनी असा उल्लेख केला की, मला शेतीतलं काय समजतं पण हे काही नवीन नाही त्यामुळे ते जाऊ देत”, असं शरद पवार म्हणाले. “काही दिवसांपूर्वी निवडणुकीआधी अमित शहा नावाचे गृहस्थ या जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी असेच सांगितले की, शरद पवार को क्या समझता है? लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला आणि सांगितलं की, त्यांना हे समजतं व नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
“अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू”, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.