उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आमदार अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांबद्दल विविध गौप्यस्फोट केले. शरद पवारांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला लावलं. तसेच अनिल देशमुखही आमच्याबरोबर यायला तयार होते. पण भाजपाने मंत्रीपद देण्यास विरोध केला, त्यामुळे अनिल देशमुख महायुतीत आले नाहीत, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
अजित पवारांच्या या गौप्यस्फोटांवर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजीनामा मागे घेण्यासाठी शरद पवारांनीच आंदोलन करायला लावलं, या अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवार म्हणाले की, मी राजीनामा देतो, असं म्हणायचं कारण काय होतं? पक्षाचा अध्यक्ष मीच होतो. तसा सामूहिक निर्णय झाला होता. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याचं काहीही कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की, भारतीय जनता पार्टीबरोबर जायला नको. अनिल देशमुखही याच मताचे होते, त्यांनी कालही तेच जाहीर केलं. एवढंच नव्हे तर हा रस्ता आपला नव्हे, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर वेगळ्या पद्धतीने करणं योग्य नाही, असं मला वाटतं.
हेही वाचा- अटकेच्या चर्चेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला अटक झाल्यावर…”
“राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करा, असं सांगायची काय गरज होती? मी स्वत: राजीनामा दिला होता. मला बदल करायचा असेल तर आनंद परांजपे किंवा जितेंद्रची परवानगी घ्यायची गरज नाही. यांना बोलावून सांगायची गरज नव्हती. माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे”, असंही शरद पवार म्हणाले.