पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासह विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारत निशाणा साधला आहे. ते ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात बोलत होते.

ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून उपस्थिती लोकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “काल नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचं उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” अशी टीका शरद पवारांनी केली.

हेही वाचा- “आनंद दिघेंना जामिनासाठी शरद पवारांनी मदत केली”, ‘तो’ किस्सा सांगत आव्हाडांचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार पुढे म्हणाले, “मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची कार्यक्रमं पाहिली आहेत. भाषणं ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही,” असंही शरद पवार म्हणाले.