विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली व चाचपणी सुरू झाली असून, आज शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत नगर जिल्हय़ातील नगर शहर व कर्जत-जामखेड या दोन मतदारसंघांच्या जागा आघाडीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदविण्यात आली. विधानसभा निवडणूक काँग्रेसबरोबर आघाडी करून लढवायची की स्वतंत्र लढवायची याचाही अहवाल पवार यांनी पक्षनिरीक्षक व जिल्हाध्यक्षांकडे १५ दिवसांत मागितला आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांना पवार यांनी मुंबईत निमंत्रित केले होते. त्यासाठी पालकमंत्री मधुकर पिचड, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार बबनराव पाचपुते, आ. शंकरराव गडाख, आ. चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, महापौर संग्राम जगताप, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय काही पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे रविवारीही निमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र उपाध्यक्ष मोनिका राजळे अनुपस्थित होत्या.
मागील वेळी काँग्रेसने अधिक जागा जिंकल्यावर विधानसभेसाठी जादा जागांची मागणी केली होती, त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील चित्र पाहता जिल्हय़ातील कोणत्या जादा जागा मागता येतील, याची माहिती पवार यांनी पदाधिकाऱ्यांना विचारली. त्यावर जिल्हाध्यक्ष शेलार यांनी नगर व कर्जत-जामखेड मतदारसंघात पक्षाला चांगली परिस्थिती राहील याकडे लक्ष वेधले. यासंदर्भात व विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की काँग्रेसबरोबर आघाडी करून, यासंदर्भात जिल्हाध्यक्ष व पक्षनिरीक्षकांनी १५ दिवसांत अहवाल देण्यास पवार यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हय़ातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन अहवाल देण्याची सूचना त्यांनी केली.
लोकसभेप्रमाणे आपसात वाद न करता विधानसभा एकत्रितपणे लढा, मतभेद बाजूला ठेवा. लोकसभा निवडणुकीत येथे बसलेल्या काहींनी विरोधात कशा पद्धतीने काम केले याची माहिती आपल्याला मिळाली आहे, त्यासंदर्भात आपण काहींशी बोललो आहे, काहींशी लवकरच बोलेन. याचा परिणाम आता विधानसभेच्या निवडणुकीवर होऊ देऊ नका, असेही पवार यांनी उपस्थितांना बजावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp claim on nagar city and jamkhed for legislative assembly
First published on: 07-06-2014 at 03:55 IST