राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याने सर्वत्र सरकारवर टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा अपमान सरकारने केला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अपमानास्पद असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट असल्याचे म्हणत शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला २१ तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा : “सरकारला शिवरायांच्या अपमानाचे उत्तर जनता लवकरच देईल”

राज्यातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने ‘स्थानिक’ भाषा माध्यमातील शाळांना शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे बिरूद चिकटवले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही सुरू केले. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून ही बाब समोर आली आहे.

चौथीच्या वर्गाला शिवाजी महाराजांचा इतिहास हा गेली अनेक वर्षे  शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांत काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या वादंगानंतर चौथीच्या पुस्तकांतील शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याबाबत विधिमंडळात ठराव झाला होता. त्यानंतर सरकार बदलले, अभ्यासक्रम बदलले तरी चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि शिवाजी महाराज हे समीकरण कायम राहिले. २०१० मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतानाही चौथीचे इतिहासाचे पुस्तक शिवाजी महाराजांवरच ठेवण्यात आले. पहिल्यांदा १९७० मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर त्याच्या मांडणीत कालानुरूप काही बदल झाले. मात्र चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मूळ गाभा तोच ठेवण्यात आला. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे.

पुस्तकात काय?
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाही. केवळ भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dhananjay munde criticize bjp government over scrapping shivaji maharaj chapter from school book jud
First published on: 17-10-2019 at 12:44 IST